अतिक्रमण हटावमुळे शहर मोकळे
By Admin | Updated: January 29, 2015 23:11 IST2015-01-29T23:11:44+5:302015-01-29T23:11:44+5:30
शहरातील अंतर्गत रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे शहराचे सौंदर्यीकरण धोक्यात आले होते. यामुळे उच्च न्यायालयाचे आदेश व राज्य शासनाच्या निर्देशामुळे शहरात २८ ते ३१ जानेवारी

अतिक्रमण हटावमुळे शहर मोकळे
पुलगाव : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे शहराचे सौंदर्यीकरण धोक्यात आले होते. यामुळे उच्च न्यायालयाचे आदेश व राज्य शासनाच्या निर्देशामुळे शहरात २८ ते ३१ जानेवारी या काळात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. प्रारंभीच्या दोन दिवसात जवळपास दोनशे अतिक्रमण हटविण्यात आले. शहरातील अनेक चौकांना भग्नावशेषाचे स्वरूप प्राप्त झाले. अतिक्रमण हटाव मोहिमेतून विद्यमान नगराध्यक्षापासून, माजी नगराध्यक्ष व दिग्गज देखील सुटू शकले नाहीत.
स्वच्छ व सुंदर शहर मोहीमेअंतर्गत नगर प्रशासनाने राबवित असलेल्या मोहिमेबाबत अतिक्रमण धारकांचा नगरपरिषद अधिनियम १६५ अंतर्गत व्यावसायिकांनी शहरातील रस्ते, नाल्या व शासकीय जागेवर केलेले अवैध बांधकाम हटविण्याच्या पूर्व सूचना संबंधितांना दिल्या होत्या. परिसरातील काही मंडळींनी अतिक्रमण स्वत:च हटविले. शासनाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या या अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत छोट्या व्यावसायिकांत नाराजीचा सूर आहे. यात काहींनी पालिकेवर मोर्चा नेत नाराजी व्यक्त केली.
गुरुवारी या मोहिमेत अतिक्रमण हटविल्यामुळे शहरातील भगतसिंग चौक, तुकडोजी चौक, आठवडी बाजार, बस स्थानक परिसराचे सुटकेचा नि:श्वास घेतला. मोहीमेत मुख्याधिकाऱ्यांसह १५० कर्मचारी, अधिकारी, २५ पोलीस, चार जेसीबी व चार ट्रॅक्टरच्या मदतीने ही मोहीम सुरू आहे. या संदर्भात मुख्याधिकारी राजेश भगत यांच्याशी नगरपरिषद कार्यालयात व भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही तर मुख्याधिकाऱ्यांसह या मोहिमेतील सर्वच कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी बंद असल्याचे सांगण्यात आले. यामुळे कारवाई दरम्यान होत असलेल्या घडमोडी कळू शकल्या नाहीत.(तालुका प्रतिनिधी)