चिस्तूर-आनंदवाडी रस्त्याला बाभुळबनाचा विळखा
By Admin | Updated: April 27, 2015 01:41 IST2015-04-27T01:41:49+5:302015-04-27T01:41:49+5:30
चिस्तूर ते आनंदवाडी या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा बाभळीचा झाडे व झुडपांचा विळखा पडला आहे.

चिस्तूर-आनंदवाडी रस्त्याला बाभुळबनाचा विळखा
तळेगाव (श्या.पं.) : चिस्तूर ते आनंदवाडी या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा बाभळीचा झाडे व झुडपांचा विळखा पडला आहे. रस्त्यालगतच्या बाभळीचे झाडे उंच वाढले असून या रस्त्याने आवागमन करणे कठीण झाले आहे. बांधकाम विभागाने याची दखल घेत झुडपे कापण्याची मागणी वाहन चालकातून होत आहे.
या मार्गावर वर्दळ असते. यात दोन्ही बाजुने जड वाहने आल्यास दुचाकी वाहन चालकाला रस्त्याच्या कडेला वाहन खाली घेताना त्रास होतो. शिवाय वाहन चालवितांना बाभळीच्या काट्याचा मार सहन करावा लागतो. या मार्गाला असलेला बाभुळबनाचा विळखा वाहन चालकांसाठी त्रासदायक ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत अनेक वेळा तक्रार करण्यात आली. बाभुळबन तोडण्याची मागणी करुनही संबंधीत विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.
चिस्तूर ते आनंदवाडी मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. काही भागात तर रस्ता दबल्याने यातून आवागमन करताना त्रास होतो. यामार्गाने दिवसरात्र रेतीचे ट्रक, ट्रॅक्टर अशी जड वाहनांची वर्दळ असते. विरुद्ध दिशेने जड वाहन आले की दुचाकी, आॅटो यासारख्या वाहनांना जागा नसते. काटेरी बाभळीमुळे रस्ताच शिल्लक नसतो. अशा वेळी बाजुला वाहन थांबवावे तरी कोठे असा प्रश्न पडतो. झाडांना असलेली काटे अंगाला रुततात. यात दुखापत होण्याचा धोका असतो. झाडांच्या वाकलेल्या फांद्यामुळे मार्गावरील वळणावर समोरुन येणारे वाहन नजरेस पडत नाही. संबंधीत विभागाने या मार्गाची त्वरीत पाहणी करून काटेरी झुडपे तोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.(वार्ताहर)