पंचायत समितीचे सभापतिपद खुल्या प्रवर्गाकडे
By Admin | Updated: July 22, 2014 00:01 IST2014-07-22T00:01:07+5:302014-07-22T00:01:07+5:30
नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षण धोरणानुसार कारंजा पंचायत समिती सभापतीचे पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षीत करण्यात आले आहे़ यामुळे भाजपा व काँगे्रसने सभापतीपद आपल्याकडे

पंचायत समितीचे सभापतिपद खुल्या प्रवर्गाकडे
मोर्चेबांधणीला वेग : निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष
कारंजा (घा़) : नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षण धोरणानुसार कारंजा पंचायत समिती सभापतीचे पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षीत करण्यात आले आहे़ यामुळे भाजपा व काँगे्रसने सभापतीपद आपल्याकडे ठेवण्याकरिता राजकीय मोर्चेबांधणीला वेग दिल्याचे दिसते़
सध्या भाजपाचे मोरेश्वर भांगे विद्यमान सभापती आहेत़ हे सभापती पद आपल्या पक्षाकडे कायम ठेवण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत़ याच पक्षाच्या उपसभापती प्रेमीला चौधरी यांचे सदस्यपद ग्रा़पं़ चा कर न भरल्याने रद्द झाले़ राजकीय परिस्थिती बरीच बदलली असून पक्षबल कमी झाले आहे़ भाजपा सभापतीपद आपल्याकडे राखू शकेल वा नाही, हा प्रश्नच आहे़ यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रसच्या एकमेव सदस्य शुभांगी पठाडे यांची मदत घ्यावी लागणार आहे; पण त्या स्वत: सभापती पदासाठी इच्छुक असल्याने त्या बिनशर्त पाठिंबा कशा देतील, हाही प्रश्नच आहे़ राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची वरच्या पातळीवर युती असल्याने युतीच्या विरोधात मतदान करण्यासाठी त्यांना परवानगी कशी मिळणार, हे ही एक कोडेच आहे़
सध्या पं़स़चे पक्षबल पाहता भाजपकडे ४, काँगे्रसकडे ४ तर राष्ट्रवादीकडे १ सदस्य आहे़ भाजपचा एक सदस्य निलंबित झाला आहे़ काँग्रेसला आपल्या पक्षाचा सभापती बनवायचा असेल तर राष्ट्रवादीच्या सदस्याची मदत घेणे वा भाजपमधून एखादा नाराज सदस्य ओढणे आवश्यक आहे; पण मोदी-लाटमध्ये भाजपाचा सदस्य ओढणे कठीण आहे़ तालुक्यात भोयर-पवार समाज अधिक असल्याने कोणत्याही पक्षाचा होवो; पण भोयर-पवार समाजाचा सभापती व्हावा, अशी समाजाची इच्छा आहे़ भाजपकडे भोयर-पवार समाजाचा एकही पं़स़ सदस्य नाही़ काँग्रेसकडे मात्र दोन सदस्य आहेत़ भाजप व काँगे्रसकडे चार-चार असे सारखे संख्याबळ असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य या संधीचा फायदा घेत सभापती पद प्राप्त करतील, ही शक्यता नाकारता येत नाही़ त्या भोयर-पवार समाजाच्या असून खुल्या प्रवर्गाच्या दावेदार आहेत़ एकंदरीत राजकीय स्थिती दोलायतमान असून वेळेवर कोण व कशी बाजी मारेल, हे सांगता येत नाही़ दोन्ही पक्षांचे नेते पोटतिडकेने प्रयत्न करताहेत़ विधानसभा निवडणुकीमुळे सभापती पदाच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे़(तालुका प्रतिनिधी)