थकीत देयकांकरिता कंत्राटदारांचे साखळी उपोषण
By Admin | Updated: December 15, 2014 23:07 IST2014-12-15T23:07:26+5:302014-12-15T23:07:26+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने कंत्राटदारांना कामे दिली जातात; पण त्यांची देयके अदा केली जात नाहीत़ यामुळे कंत्राटारांना जवळचा पैसा खर्च करून कामे करावी लागत आहे़ वर्धा

थकीत देयकांकरिता कंत्राटदारांचे साखळी उपोषण
२८़६१ कोटींची देयके थकली : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
वर्धा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने कंत्राटदारांना कामे दिली जातात; पण त्यांची देयके अदा केली जात नाहीत़ यामुळे कंत्राटारांना जवळचा पैसा खर्च करून कामे करावी लागत आहे़ वर्धा जिल्हा कंत्राटदार कल्याण समिती व सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे तब्बल २८ कोटी ६१ लाख रुपयांची देयके अद्यापही थकली आहेत़ यामुळे सोमवारपासून (दि़१५) कंत्राटदारांनी साखळी उपोषण सुरू केले आहे़ थकीत देयके त्वरित काढण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे़
सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे गत १० महिन्यांपासून कामांचे प्रलंबित देयके अदा करण्यात आलेली नाहीत़ यात पूरहानी दुरूस्ती १ कोटी ५० लाख, पर्यटन ७० लाख, मार्ग व पूल २ कोटी व १७ कोटी, इमारती दुरूस्ती २ कोटी व १ कोटी, आयटीआय इमारत ७० लाख, तांत्रिक माध्यमिक ५० लाख, सामान्य रुग्णालय २ कोटी ११ लाख, खासदार फंड अविनाश पांडे १० लाख आणि २०१५ विशेष निधीतील एक कोटी रुपयांची देयके थकलेली आहेत़
एकूण २८ कोटी ६१ लाख रुपयांची देयके प्रलंबित असल्याने कंत्राटदार अडचणीत आले आहेत़ बांधकाम विभागाद्वारे कामांचे कंत्राट दिले जाते; पण देयके काढली जात नसल्याने जवळच्या रकमेतून विकासाची कामे करावीत काय, असा प्रश्न कंत्राटदार संघटनांनी उपस्थित केला आहे़ त्रस्त झालेल्या वर्धा जिल्हा कंत्राटदार कल्याण समिती व सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्यावतीने उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे़ सोमवारपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेटजवळ साखळी उपोषण सुरू केले आहे़ दररोज काही कंत्राटदार उपोषणात सहभाग घेणार आहे़
साखळी उपोषण आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष किशोर मिटकरी, राजू वानखेडे, राजू सराफ, अजय पाल, विनोद चव्हाण, प्रशांत धोटे, अभय मॅडमवार, अशोक चंदनखेडे, विजू अण्णा, सुनील बासू, शैलेंद्र झाडे, गौरव मेश्राम, अमोल क्षीरसागर, संजय नंदनवार, सारंग चोरे, रंजीत इंगोले, स्टीवन रॉबर्ट, हेमंत नरहरशेट्टीवार, अजय घवघवे, राजेश हाडोळे, सुरेश दातीर, विद्यानंद भाटीया, सुनील शेरजे, मनीष गंगमवार, दीपक पांगुळ, राजू वाकडे, होरे, फिरोज खान, यादव महाराज, अमर राठोड, राजेश नासरे, अतुल सातपुते आदींनी सहभाग घेतला आहे़ शासनाने याकडे लक्ष देत कंत्राटारांची देयके त्वरित अदा करावी आणि घेतलेली कामे पूर्ण करण्याकरिता चालना देण्याची मागणी संघटनेद्वारे करण्यात आली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)