सीसीआयने चांगल्या कापसासाठी खरेदी थांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:00 IST2019-11-13T06:00:00+5:302019-11-13T06:00:18+5:30
सध्या काही ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. परंतु, समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरीही नाराज आहे. शुभारंभाचे मुहूर्तावर येथील जय बजरंग जीनिंग मध्ये एक हजार क्विंटल व संजय इंडस्ट्रीज येथे दोन हजार क्विंटल कापसाची खरेदी करून प्रति क्विंटल ४ हजार ६०० ते ५ हजार १४१ रूपयेपर्यंतचे भाव देण्यात आला.

सीसीआयने चांगल्या कापसासाठी खरेदी थांबविली
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : सध्या बाजारात कापूस विक्रीला आला असला तरी यामध्ये ओलाव्याचे प्रमाण असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जोपर्यंत गुणवत्तापूर्ण कापूस विक्रीला येत नाही तोपर्यंत खरेदीचा मुहूर्त साधला जाणार नसल्याचे सीसीआयचे ग्रेडर सांगत आहेत. कापूस खरेदीबाबत सीसीआयचा हा आडमुठीपणा शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकणारा ठरत असून याचाच फायदा सध्या व्यापारी घेत आहे. इतकेच नव्हे तर व्यापारीही शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत असल्याने सीसीआयने कापूस खरेदी तातडीने सुरू करावी, अशी मागणी आहे.
सध्या काही ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. परंतु, समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरीही नाराज आहे. शुभारंभाचे मुहूर्तावर येथील जय बजरंग जीनिंग मध्ये एक हजार क्विंटल व संजय इंडस्ट्रीज येथे दोन हजार क्विंटल कापसाची खरेदी करून प्रति क्विंटल ४ हजार ६०० ते ५ हजार १४१ रूपयेपर्यंतचे भाव देण्यात आला. सीसीआयचा भाव प्रतिक्विंटल ५ हजार ५५० इतका असून तो खासगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत जादा आहे. त्यामुळे सीसीआयची खरेदी सुरू झाल्याशिवाय कापसाचे भावात तेजी येणार नसल्याचे बोलले जात आहे. मागील हंगामात शेतकऱ्यांचा बहुतांश कापूस बाजारात विकल्या गेल्यानंतर भावात वाढ झाली. त्याचा जास्तीत जास्त फायदा खासगी व्यापाऱ्यांनाच झाला. यावेळीही या परिसरातील कपाशी उत्पादकांना प्रतिक्विंटल ५ हजार ८०० ते ६ हजार ३०० रूपयेपर्यंतचे भाव मिळाले. व्यापाऱ्यांच्या तुलनेत सीसीआयचे भाव कमी असल्याने सीसीआयच्या कापूस खरेदीला पाठ दाखविण्यात आली होती. त्यावेळी देवळी केंद्रावर खासगी व्यापाऱ्यांकडून पावणे पाच लाख क्विंटल तसेच सीसीआयचेवतीने १९ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली; पण यावर्षी सततच्या पावसामुळे कापसाच्या हंगामाला उशीरा सुरुवात झाली. त्यातच परतीच्या पावसामुळे कापूस ओला झाला. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी आलेल्या कापसात बऱ्यापैकी आद्रता असल्याचे दिसून येते. याचाच फायदा घेऊन खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव पाडले असल्याची चर्चा सध्या शेतकऱ्यांमध्ये होत आहे. सीसीआयच्या लवाजमा याठिकाणी आठ दिवसांपूर्वीच आला असला तरी कापूस खरेदीच्या मुहूर्ताला अजून सुरुवात झालेली नाही, हे विशेष.
सीसीआयचे कापूस खरेदीचे भाव प्रति क्विंटल ५ हजार ५५० रूपये आहे. कापसाची गुणवत्ता तपासून भाव देण्यात येणार आहे. कापूस ओला असल्यास दिल्या जाणाऱ्या भावात ८ ते १२ टक्के कपात करणार आहे. जोपर्यंत चांगला कापूस बाजारात विक्रीसाठी येणार नाही, तोपर्यंत सीसीआय खरेदी करणार नाही.
- रमेशकुमार बोरवले, ग्रेडर, सीसीआय, देवळी.