सिलिंडर चोरी प्रकरणी चार रेल्वे पोलिसांविरूद्धच चोरीचा गुन्हा दाखल

By Admin | Updated: July 22, 2015 02:48 IST2015-07-22T02:48:39+5:302015-07-22T02:48:39+5:30

येथील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या एका किराणा दुकानातून रेल्वेच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांनी रिकामे सिलिंडर उचलून नेले.

In the case of cylinder theft, theft against four police officers was registered | सिलिंडर चोरी प्रकरणी चार रेल्वे पोलिसांविरूद्धच चोरीचा गुन्हा दाखल

सिलिंडर चोरी प्रकरणी चार रेल्वे पोलिसांविरूद्धच चोरीचा गुन्हा दाखल

न्यायालयाचा आदेश : रेल्वे स्थानक परिसरातील घटना
पुलगाव : येथील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या एका किराणा दुकानातून रेल्वेच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांनी रिकामे सिलिंडर उचलून नेले. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली असता कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे दुकान मालकाने न्यायालयात धाव घेतली. सदर प्रकरणाची चौकशी करून चारही पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने नुकतेच दिले. या आदेशावरून चारही कर्मचाऱ्यांवर मंगळवारी पुलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ए.पी. मसराम, जी. एस. परिहार, अनिल सालवे, दीपक पाटील सर्व रेल्वे पोलीस दल पुलगाव अशी गुन्हा दाखल असलेल्यांची नावे आहेत.
येथील रेल्वे स्टेशन चौकातील झुलेलाल डेली निडस् दुकानातून रेल्वे पोलिसांच्या चार कर्मचाऱ्यांनी ३ हजार रुपये किमतीचे घरघुती गॅस सिलिंडर उचलून नेले होते. ही घटना ३ मार्च २०१५ रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली होती. या बाबत दुकान मालक अमित रामचंद्र आहुजा यांनी त्यांना विचारले असता कारवाई करून परत आणून देतो, असे सांगितले होते. पाच दिवस लोटूनही सिलिंडर परत आणून देण्यात आले नाही. त्यामुळे ८ मार्च रोजी आहूजा यांनी रेल्वे पोलीस उपनिरीक्षक जी. एस. परिहार यांच्याकडे सिलिंडर परत करा किंवा सिलिंडर जप्तीची कागदपत्रे देण्यात यावे अशी लेखी मागणी केली. परिहार यांनी तक्रार अर्ज घेण्यास मनाई करून तुम्ही या फंदात पडू नका, अन्यथा तुम्हाला पाहून घेऊ अशी धमकी दिली. यामुळे त्रस्त झालेल्या अमित आहुजा यांनी न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयात सुनावणी होऊन द्वितीय श्रेणी न्यायाधीश एस.पी. पुराडउपाध्ये यांनी चारही रेल्वे पोलिसांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या चारही जणांवर भादंवि कलम ३७९, ३४ अन्वये रेल्वे पोलिसांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाच्या या आदेशावरून रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: In the case of cylinder theft, theft against four police officers was registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.