पहिल्याच दिवशी १ हजार ८३६ क्विंटल सोयाबीनची खरेदी
By Admin | Updated: October 8, 2015 01:46 IST2015-10-08T01:46:27+5:302015-10-08T01:46:27+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी धान्य खरेदीच्या नवीन हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

पहिल्याच दिवशी १ हजार ८३६ क्विंटल सोयाबीनची खरेदी
३७५० रुपये मिळाला भाव : कृउबास धान्य खरेदीचा शुभारंभ
सेलू : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी धान्य खरेदीच्या नवीन हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी १ हजार ८३६ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनला ३७५० रुपेय प्रती क्विंटल भाव देण्यात आला.
बाजार समितीचे नवनियुक्त सभापती विद्याधर वानखेडे यांच्या हस्ते उपसभापती रामकृष्ण उमाटे, संचालक व सचिव आय.आय. सुफी यांच्या उपस्थितीत काटापूजन करण्यात आले. प्रथम शेतकरी लक्ष्मण दांडेकर यांचा शाल, श्रीफळ देऊन तर अन्य शेतकऱ्यांचा उपसभापती उमाटे व मान्यवरांनी सत्कार केला.
शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाचा चुकारा नियमाप्रमाणे २४ तासांत अडत्यांनी द्यावा. न मिळाल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी. व्यापाऱ्यांनी अडत्यांची रक्कम विहित मुदतीत न दिल्यास त्यांची बोली बाद करण्याच्या सूचना करीत सभापती वानखेडे यांनी १५ किमीपेक्षा अधिक अंतरावरील शेतकऱ्यांनी धान्यमाल विक्रीस आणल्यास त्यांना प्रती क्विंटल ५ रुपये अतिरिक्त वाहतूक अनुदान देण्याची तरतूद आहे, असे सांगितले. शेतकरी त्याचा फायदा घेत नाही. या योजनेचा लाभ घेण्याची विनंतीही त्यांनी केली.
शेतमाल तारण योजनेंतर्गत धान्य मालावर शेतकऱ्यांना वार्षिक ६ टक्के दराने ७५ टक्के रक्कम देण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी अद्यावत शेताचा सातबारा आणावा. बाजार भाव अधिक आवक झाल्यास पडतात. यात शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी ५० लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव पाठविल्याचे सांगत वानखेडे यांनी बाजार समितीच्या सुधारीत धोरणांबाबतही विस्तृत माहिती दिली.(तालुका प्रतिनिधी)