आर्वीत बसची दुचाकीला धडक, दोन जखमींपैकी एक गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 18:53 IST2019-12-06T18:53:12+5:302019-12-06T18:53:42+5:30
बसने दुचाकीला धडक दिल्याने एक गंभीर तर एक किरकोळ जखमी झाल्याची घटना येथील कोर्टासमोर शुक्रवारी सायंकाळी घडली.

आर्वीत बसची दुचाकीला धडक, दोन जखमींपैकी एक गंभीर
वर्धा ( आर्वी): बसने दुचाकीला धडक दिल्याने एक गंभीर तर एक किरकोळ जखमी झाल्याची घटना येथील कोर्टासमोर शुक्रवारी सायंकाळी घडली. गंभीर जखमी झालेल्या युवकास नागपूरला उपचारार्थ पाठवित असल्याची माहिती मिळाली आहे. मंगेश सुधाकर निघोट ( वय29) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे, तर संदीप नारे (वय 28, दोघेही राहणार नेरी पुनर्वसन) असे किरकोळ जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
हे दोघे युवक बसस्थानकावरून दुचाकीने नेरी पुनर्वसनकडे आपल्या घरी जात असताना हा अपघात घडला. mh-40/8707 या क्रमांकाच्या बसने दुचाकीला धडक दिली, ही दुचाकी संदीप नारे चालवित होता, धडक बसल्याने मंगेश निघोट खाली पडून गंभीर जखमी झाला, त्याच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले असून, डोळ्याजवळ व तोंडाला ही जखम झाली आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
गौरव जाजू आणि आरिफ खान यांनी दोघा जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवकाते यांनी गंभीर जखमी झालेल्या मंगेश निघोट याच्यावर उपचार करून चेहऱ्याला चार टाके दिले, गौरव जाजू यांनी गंभीर जखमी झालेल्या युवकास नागपूर ट्रामा केअर युनिटमध्ये उपचारासाठी पाठवले आहे . उपजिल्हा रुग्णालयात पोलिसांनी जखमीचा जबाब घेऊन चौकशी सुरू केली होती.