'Break' in Sevagram plan works | सेवाग्राम आराखड्यातील कामांना ‘ब्रेक’

सेवाग्राम आराखड्यातील कामांना ‘ब्रेक’

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आदेश; पवनार, वरूड येथील विविध विकास कामे प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधी यांच्या जयंतीला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सेवाग्राम परिसरातील क्षेत्राचा विकास करण्याचे शासनाने ठरविले. त्याला सेवाग्राम विकास आराखडा असे नाव देण्यात आले. याकरिता निधीला मंजुरी मिळाली. आराखड्याअंतर्गत काही कामे पूर्णत्वास गेली असतानाच पवनार व वरुड येथील विकासकामांना पालकमंत्र्यांनी अचानक थांबा दिला आहे. त्यामुळे विकास आराखड्याच्या कार्यान्वयनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागले आहे.
वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिली आहे. सेवाग्राम आश्रमातूनच बापूंनी स्वातंत्र्य चळवळीला दिशा देण्याचे काम केले. त्यामुळे या पावनभूमीचा विकास करण्याचे शासनाने निश्चित केले. त्याच अनुषंगाने सेवाग्राम विकास आराखडा तयार करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली आहे. एकूण पाच टप्प्यात आराखड्यांतर्गत कामे हाती घेण्यात आली असून २ ऑक्टोबरपूर्वी पूर्णत्वास न्यायची आहेत. सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत पवनार येथे ६०९.९७ तर मौजा वरुड (रेल्वे) येथे ९९१.४८ लाखांच्या विकासकामांना मान्यता मिळाली. या अंतर्गत पवनार येथे सिमेंट रस्ता बांधकाम, नालीचे बांधकाम, सार्वजनिक ठिकाणी एलईडी दिवे बसविणे, सचिवालय इमारतीमधील वाचनालय, वॉर्ड क्रमांक २ वाजूरकर ले-आउटमधील बगिचाचा विकास, धामनदीच्या काठावर स्मशानभूमीजवळ घाट बांधकाम, सार्वजनिक ठिकाणी हायमास्ट दिवे, ४० किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संच बसविणे, ग्रामपंचायत भवन बांधकाम, तर वरुड येथे सिमेंट रस्ता बांधकाम, नाली बांधकाम, नाला बांधकाम, वॉर्ड क्रमांक १ ते ५ मध्ये अतिरिक्त वीजखांबांसह पथदिवे बसविणे, खुल्या जागांचे सौंदर्यीकरण, धन्वंतरीनगर चौकात हायमास्ट दिवे लावणे, ४० किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संच बसविणे आदी कामांचा समावेश होता. पवनार येथील नवीन ग्रामपंचायत भवन तसेच स्मशानभूमीचे नूतनीकरण व वरुड येथील सिमेंट रस्ता आदी विकासकामांना पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी २४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला थांबा देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कोरोना लॉकडाऊननंतर आराखड्यातील विकासकामांना पुन्हा एकदा ब्रेक लागल्याने गांधी जयंतीपूर्वी विकासकामे पूर्णत्वास जाण्याची आशा धूसर झाली आहे.

सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत वरुड व पवनार परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनाने १७.५२ कोटींच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर या कामांच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विकासकामांवर विपरित परिणाम होणार असून परिसरातील नागरिकांत नाराजी आहे. निधी उपलब्ध झालेल्या विकासकामांना स्थगिती न देता ती सुरळीत करावी.
डॉ. पंकज भोयर, आमदार, वर्धा

Web Title: 'Break' in Sevagram plan works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.