पशुधनांनाही बीपीएल सुविधा मिळाव्यात

By Admin | Updated: August 23, 2014 02:02 IST2014-08-23T02:02:19+5:302014-08-23T02:02:19+5:30

कृषी व्यवसायाला पुरक जोडधंदा म्हणून पशुव्यवसायाचा उल्लेख होतो. शासनाच्या नियोजनात कृषी विभागाकरिता भरीव तरतूद केली जाते. तुलनेने पशुव्यवसायाला डावलल्या जाते.

BPL facilities should also be provided to the livestock | पशुधनांनाही बीपीएल सुविधा मिळाव्यात

पशुधनांनाही बीपीएल सुविधा मिळाव्यात

श्रेया केने वर्धा
कृषी व्यवसायाला पुरक जोडधंदा म्हणून पशुव्यवसायाचा उल्लेख होतो. शासनाच्या नियोजनात कृषी विभागाकरिता भरीव तरतूद केली जाते. तुलनेने पशुव्यवसायाला डावलल्या जाते. पशुपालन व्यवसायाला समाजात प्रतिष्ठा नसल्याने शेतकऱ्यांची मुलेही गोधन पाळण्यात रूची दाखवत नाही. या व्यवसायाच्या उत्थानासाठी प्राथमिक स्तरापासून प्रयत्न व्हायला हवे. जनावरांच्या संगोपनाचा खर्च अधिक आहे. याकरिता पशुंचा समावेश बीपीएल अंतर्गत करून त्यानुसार शेतकरी व पशुपालकांना शासकीय सवलती देण्याची गरज आहे, असे मत गोरस भंडार सहकारी दुग्ध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष वसंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
गोरस भंडार या संस्थेविषयी माहिती देताना ते म्हणाले, महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या प्रेरणेतून मगनवाडी येथे गोरस भंडार सुरू करण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काळात माझे वडील म्हणजे महादू हरी पाटील यांनी गोरस भंडार संस्थेचा कार्यभार सांभाळला. कालांतराने याचे सहकारी संस्थेत परिवर्तन करण्यात आले. आज या संस्थेची आर्थिक उलाढाल वर्षाला २० कोटींहून अधिक आहे. या संस्थेच्या माध्यमातून १५० लोकांना नियमित रोजगार मिळाला असून एक हजार दुग्ध उत्पादक या संस्थेसोबत संलग्न आहेत.
या क्षेत्रात कार्य करण्याचा निर्णय कसा घेतला, यावर ते म्हणाले, घरी कृषी व्यवसायासोबत पशुधन असल्याने परंपरागत व्यवसाय होता. शिवाय मी कृषी शास्त्राचा पदवीधर असल्याने पशू संगोपण आणि दुग्धव्यवसाय याचे तांत्रिक शिक्षण घेतले होते. ही पार्श्वभूमी असल्याने सहजच या क्षेत्रात पावले स्थिरावली.
भारतात श्वेतक्रांती झाली. यानंतरही दुग्ध उत्पादकांवर गोधन विकण्याची वेळ आली आहे. या स्थितीची कारणमिमांसा करताना ते म्हणाले, पूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांकडे काही ना काही गोधन असायचे. पण आजघडीला तो खते, बियाणे याबाबत परावलंबी झाला आले. ज्वारीचे उत्पादन घटले. यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उद्भवला. पशुखाद्याचे दर शेतकऱ्याला परवडेनासे झाले. यातून गोधन कसायाच्या हाती जात आहे. पशूंपासून मिळणारे शेण, गोमुत्रचा वापर पूर्वी शेतीत होते असे. हळूहळू ही जैविक साखळी निखळत गेली. ही स्थिती पूर्ववत करण्यासाठी पशुखाद्य सवलतीच्या दरात देणे आवश्यक आहे. कारण आज माणसाचे खाद्य तुलनेने कमी दरात उपलब्ध आहे. कच्चा दुधाचा योग्य विनियोग केल्यास दुग्ध विक्री हा चांगले आर्थिक उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. क्रॉसब्रीड केल्याने दुधाचे उत्पादन वाढविता आले; मात्र देशी गाईच्या दुधाला पर्याय नाही. देशी वाणाचा विकास व्हावा, दुधाचे दर ५० रुपयांपर्यंत असावे. महागाईचा वाढता दर पाहता दुधाचे दर तुलनेने कमीच आहे. शासनाचे नियमही पशुपालकांच्या पथ्यावर आहे. नियमांत लवचिकता नाही. याबाबी व्यवसायाला मारक ठरत आहे. गोरसपाकाची ख्याती आंतरराट्रीय पातळीवर पोहचली असली तरी पदार्थाची गुणवत्ता टिकवणे आणि दळणवळण या समस्या असल्याने त्याची निर्यात करणे शक्य होत नाही.

Web Title: BPL facilities should also be provided to the livestock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.