बसस्थानकावर बॉम्बच्या अफवेने धडकी
By Admin | Updated: August 3, 2015 01:48 IST2015-08-03T01:48:23+5:302015-08-03T01:48:23+5:30
वेळ दुपारी १.३० वाजताची. रविवारी वर्धा बसस्थानकावर गर्दी असूनही सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक पोलिसांची धावपळ सुरू झाली.

बसस्थानकावर बॉम्बच्या अफवेने धडकी
पोलिसांच्या मॉक ड्रीलने नागरिकांची धावाधाव : वर्धेसह सेवाग्राम रेल्वे स्थानकावरही तपासणी
वर्धा : वेळ दुपारी १.३० वाजताची. रविवारी वर्धा बसस्थानकावर गर्दी असूनही सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक पोलिसांची धावपळ सुरू झाली. बघता बघता बसस्थानकावर बॉम्बची अफवा पसरली. पोलिसांकडूनही बसस्थानक रिकामे झाले. बॉम्ब निरोधक पथकही दाखल झाले. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर संशयीत वस्तू हाती आली. तिची विल्हेवाट लावताच ही पोलिसांची ‘मॉक ड्रील’ असल्याची माहिती बाहेर येताच नागरिकांचा जीव भांड्यात पडला. सुमारे अर्धातासाच्या या कारवाईने नागरिकांना मात्र चांगलीच धडकी भरली होती.
आतंकवादी संघटनेकडून काही कारवाया होण्याचे संकेत मिळाल्याचे वृत्त देशाच्या गुप्तचर विभागाच्या हाती आले आहे. यामुळे राज्य शासनाकडून सावधगिरी बाळगण्यात येत आहे. राज्य शासनाडून आलेल्या आदेशासनुसार वर्धेतही चाचपणी करण्यात आली. या दिवसात कुठेही कोणतीही घटना घडू शकते, या संशयावरून वर्धा जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने क्रियाशक्ती तपासण्याकरिता रविवारी बसस्थानकावर मॉक ड्रील राबविण्यात आली. सोबतच वर्धेसह सेवाग्राम रेल्चे स्थानकावरही तपासणी करण्यात आली.
ठरल्याप्रमाणे दुपारी १.३० वाजताच्या सुमारास शहर ठाण्यात वर्धा बसस्थानकाच्या फलाट क्रमांक १० वर एक बेवारस वस्तू पडून आहे. ती धोकादायक ठरू शकते, अशी माहिती दुरध्वनीवर आली. यावरून ठाण्याचे निरीक्षक बुराडे यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. माहिती मिळताच यंत्रणा कामाला लागली. क्षणात बॉम्ब निरोधक पथक व अग्निशमन दलाचे वाहन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलीस दाखल होताच बसस्थानकावर उपस्थित नागरिकांना त्यांच्या साहित्यासह बसस्थानकाबाहेर जाण्याची सूचना देण्यात आली. सूचना मिळताच नागरिक सैरावैरा पळू लागले. क्षणात बसस्थानक रिकामे झाले. पोलिसांनी बसस्थानकाचा ताबा घेत तपासणी केली. श्वान पथकाच्या सहाय्याने तपासणी करून संशयीत बस्तू ताब्यात घेण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, ठाणेदार एम. बुराडे, विजय मगर यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)