देवळीत शेताच्या वादातून रक्तपात; लहान भावाने मोठ्यास संपविले : तलवारीने केले सपासप वार
By रवींद्र चांदेकर | Updated: June 10, 2025 21:40 IST2025-06-10T21:40:00+5:302025-06-10T21:40:24+5:30
शहरातील नागरिकांनी शेतात एकच गर्दी केली. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळ गाठून आरोपीला गजाआड केले.

देवळीत शेताच्या वादातून रक्तपात; लहान भावाने मोठ्यास संपविले : तलवारीने केले सपासप वार
वर्धा : शेताचा वाद इतका विकोपाला गेला की, भावबंदकीच रक्तबंबाळ झाली. लहान भावाने रागाच्या भरात मोठ्या भावावर तलवारीने सपासप वार करून शेतातच ठार केले. ही घटना देवळीपासून तीन किलोमीटर अंतरावरील दिघी शिवारातील शेतात मंगळवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच, शहरातील नागरिकांनी शेतात एकच गर्दी केली. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळ गाठून आरोपीला गजाआड केले.
शंकर नानाजी येळणे (६९, रा.देवळी) असे मृताचे नाव आहे, तर बाबा नानाजी येळणे (६०, रा.देवळी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार, आरोपी बाबा येळणे आणि मृतक शंकर येळणे दोघांचेही शेत आजूबाजूला असून, घटना घडण्यापूर्वी या दोघांमध्ये शेताच्या धुऱ्यावर वाद झाला. काही दिवसांआधी आरोपी आणि मृतक या दोघांचा लहान भाऊ साहेबराव येळणे याच्या शेतीचे साहित्य चोरीला गेले होते. या साहित्यात डवरे, तिफन, नांगर, पलंग, टेबल, तसेच ओलताच्या दहा पाइपचा समावेश होता. या चोरीची शहानिशा करीत असतांना साहेबराव येळणे याला बाबा येळणे याच्यावर संशय होता. त्यामुळे साहेबराव याने मोठा भाऊ शंकर येळणे यांच्यासोबत जाऊन देवळी पोलिसात तक्रार दिली होती. ही तक्रार मृतक शंकर येळणे याच्या सांगण्यावरून करण्यात असल्याचा बाबा येळणे याला संशय होता. त्यामुळे त्याचा शंकर येळणे या मोठ्या भावावर राग होता. शंकर येळणे याचा बदला घेण्याबाबत तो आधी बोललाही होता. त्यामुळे हा वचपा काढण्यासाठीच हा हत्याकांड घडल्याचे सांगितले जात आहे.
नागरिकांची गर्दी, पोलिसांचाही डेरा
सायंकाळच्या सुमारास दिघी शिवारात तलवारीने हत्या केल्याची बातमी शहरात पोहोचताच, अनेकांनी हातचे काम सोडून येळणे यांच्या रस्त्यालगतच्या शेताकडे धाव घेतली. मृतदेह शेतातच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. लागलीच पोलिसांनीही पोहोचून घटनेचा पंचनामा केला. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल चव्हाण आणि पोलिस निरीक्षक अमोल मंडलकर हेही घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांसह त्यांचे सहकारी घटनास्थळी उपस्थित होते.
मृतदेह पाठविला सामान्य रुग्णालयात
घटनेनंतर पोलिसांनी हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी बाबा येळणे याला गजाआड केले, तसेच पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मृतक शंकर येळणे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास देवळी पोलिस करीत आहेत.