‘ब्लडप्रेशर, पल्स रेट, टेम्परेचर’ तपासणी एका क्लिकवर
By Admin | Updated: May 18, 2016 02:25 IST2016-05-18T02:25:14+5:302016-05-18T02:25:14+5:30
तंत्रज्ञान कितीही प्रगत असले तरी त्याचा लाभ ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत देश विकसित बनविण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही.

‘ब्लडप्रेशर, पल्स रेट, टेम्परेचर’ तपासणी एका क्लिकवर
‘ई-हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम’ : बा.दे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनींनी शोधले अद्ययावत वैद्यकीय उपकरण
वर्धा : तंत्रज्ञान कितीही प्रगत असले तरी त्याचा लाभ ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत देश विकसित बनविण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाने उत्तुंग झेप घेतली आहे. यात आरोग्य क्षेत्रही मागे नाही. विविध आजारांचे निदान करण्याचे तंत्रज्ञानही झपाट्याने विकसित होत आहे. बापूराव देशमुख अभियांत्रिकी महा.च्या विद्यार्थ्यांनीही अद्यावत ‘ई-हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम’ हे वैद्यकीय उपकरण विकसित केले आहे. यात एकाच वेळी तीन तपासण्या शक्य झाल्या आहेत.
अद्यावत उपकरणांच्या साह्याने आजाराचे निदान व उपचार आता सहज शक्य होत आहे. आरोग्य क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ खेडोपाड्यातील जनतेला झाला पाहिजे, याच उदात्त भावनेतून बा.दे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्यूनिकेशन इंजि. विभागाच्या अंतिम वर्षातील नेहा अली, हिमानी भोसले, प्राजक्ता कांबळे, प्राजक्ता निमजे या विद्यार्थिनींनी संगणकीकृत स्वास्थ निरीक्षण प्रणाली (ई-हेल्थ मॉनेटरिंग सिस्टीम) विकसित केली आहे.
स्वास्थ निरीक्षण प्रणालीबाबत माहिती देताना मार्गदर्शक प्रा. अनंत हिंगणीकर म्हणाले की, ग्रामीण भागात आरोग्याबाबत अनेक समस्या आहेत. पुरेशी यंत्रणा नसल्याने ग्रामीण जनतेला शहरातील रुग्णालयाची वाट धरावी लागते. त्यातही काही चाचण्या अगदी साध्या असतात. त्या तिथल्या तिथेच केल्या गेल्या तर रुग्णांना दिलासा मिळू शकतो. या अनुषंगाने हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. यात ब्लड प्रेशर, पल्स रेट, बॉडी टेम्परेचर असे तीन सेन्सर मिळून मायक्रो कंट्रोलर किट बनविण्यात आली आहे. ही किट संगणकाला जोडण्यात आली आहे. संगणकामध्ये रुग्णाचे नाव, तपासणी तारीख, वय, गाव, पत्ता असा माहितीचा डाटा तयार करण्यात आला. रुग्णांची तपासणी करताना केवळ ब्लडप्रेशरच नव्हे तर एकाच वेळी तीनही चाचण्या करण्याची सुविधा यात आहे. तीनही चाचण्यांचे मानकेही ठरलेली असतातच. चाचणी करताना ब्लड प्रेशर किती आहे, पल्स रेट आणि सद्यस्थितीत शरीराचे तापमान किती आहे हे रुग्णांना त्वरित संगणकावर दिसू शकेल. एवढेच नव्हे तर चाचण्या केल्यानंतर रुग्ध कधीही आला तर पूर्वीच्या चाचण्यांचा रेकॉर्डही त्याला बघता येईल. हा सर्व डाटा संगणकावर सुरक्षित राहील. शिवाय आरोग्य खात्याचा सर्व्हे असला तर गावातील रुग्णांची माहिती याद्वारे प्राप्त करता येईल. गावात विविध आजारांचे थैमान असते, तेव्हा हा संगणकीकृत डाटा उपयोगी पडू शकतो. हा डाटा आॅनलाईन शासकीय रुग्णालय तसेच अन्य कुठल्याही रुग्णालयात इंटरनेट माध्यमातून पाठविण्याची सोय करण्यात आली आहे.
सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी विभागाचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण गावंडे यांनी सदर प्रणाली उत्तम असून याचा रुगणांना फायदा होईल, असे सांगितले. महा.चे संचालक समीर देशमुख व प्राचार्य डॉ. एम.ए. गायकवाड यांनीही विद्यार्थिनीचे अभिनंदन करून संशोधन ग्रामीणांच्या समृद्धीकरिता झाले तरच तंत्रज्ञान फायद्याचे ठरले, असे सांगितले. विभागप्रमुख प्रा. आर.एन. मांडवगडे, संयोजक प्रा. पी.आर. इंदुरकर यांचेही सहकार्य लाभल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले.(कार्यालय प्रतिनिधी)