भुगावात ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणार ‘चायना मेड’ यंत्रसामग्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 05:00 IST2021-04-20T05:00:00+5:302021-04-20T05:00:10+5:30
या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून जिल्ह्यासाठी किती ऑक्सिजन मिळू शकतो. तसेच येथे उत्पादित होणाऱ्या लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा सध्याच्या आपातकालीन परिस्थितीत वर्धाशेजारील काही जिल्ह्यांना पुरवठा करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून व्यवहार्यता तपासण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाच्या चमूने उत्तम गलवा येथील ऑक्सिजन प्रकल्प गाठून प्रत्यक्ष पाहणी केली.

भुगावात ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणार ‘चायना मेड’ यंत्रसामग्री
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यासह राज्यावर ओढवलेल्या लिक्विड ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यासाठी भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीच्या शेजारी असलेल्या आयनाॅक्सच्या ऑक्सिजन प्रकल्पाला राज्य शासनाच्या बड्या अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. पण या ठिकाणी लिक्विड ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणारी यंत्रसामग्री चायना येथून आणावी लागणार आहे. तसेच लिक्विड ऑक्सिजन निर्मितीचे संपूर्ण युनिट तयार होण्यासाठी किमान सात महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
झपाट्याने वाढत असलेली कोविड बाधितांची संख्या तसेच त्यांना लागणाऱ्या प्राणवायुची गरज लक्षात घेता उत्तम गलवा येथील आयनॉक्स या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून जिल्ह्यासाठी किती ऑक्सिजन मिळू शकतो. तसेच येथे उत्पादित होणाऱ्या लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा सध्याच्या आपातकालीन परिस्थितीत वर्धाशेजारील काही जिल्ह्यांना पुरवठा करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून व्यवहार्यता तपासण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाच्या चमूने उत्तम गलवा येथील ऑक्सिजन प्रकल्प गाठून प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, आयुष्यमान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, उत्तम गलवाचे बिरेंद्र, मुख्य कार्यकारी अधिकारी बिजॉय कुमार आदींची उपस्थिती होती.
सध्या जिल्ह्यात सुमारे १५ हजार क्युबीक मीटर ऑक्सिजनची गरज आहे. भविष्यात ५ मेट्रिक टन किंवा त्यापेक्षा जास्त ऑक्सिजन लागल्यास एवढी मोठी गरज भागविण्यासाठी पूर्वतयारी म्हणून सद्यस्थितीत असलेल्या औद्योगिक प्रकल्पाला लागणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पातून वैद्यकीय ऑक्सिजनची गरज भागवली जाऊ शकते का? याची तयारी राज्य शासन करीत आहे, पण लिक्विड ऑक्सिजनसाठी लागणारी यंत्रसामग्री ही चायना येथे मिळत असल्याने आणि ती आयात केल्यावरही संपूर्ण युनिट उभा व्हायला किमान सात महिन्यांचा कालावधी लागेल असे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर उत्तम गलवा कंपनीतील एका बड्या अधिकाऱ्याने सांगितले. या अडथळ्यावर जिल्हा प्रशासन राज्य शासनाच्या मदतीने वेळीच कशी मात करते, याकडे वर्धा जिल्ह्यातील नागरिकांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे.