सुगंधित तंबाखूच्या कारवाईतून भांगेच्या गोळ्या बेपत्ता
By Admin | Updated: January 31, 2015 23:24 IST2015-01-31T23:24:07+5:302015-01-31T23:24:07+5:30
सुगंधित तंबाखूच्या कारवाईत देवळीतील तीन दुकानदारांकडून पावणेसात लाखांचा माल जप्त करण्यात आला; मात्र या कारवाईत आर्थिक व्यवहार झाल्याची बोंब देवळीत सुरू आहे. कारवाई करताना

सुगंधित तंबाखूच्या कारवाईतून भांगेच्या गोळ्या बेपत्ता
दुकानदार व अधिकाऱ्यांचे साटेलोटे ? : बाहेर फेकलेल्या गोळ्या नागरिकांच्या हाती
हरिदास ढोक - देवळी
सुगंधित तंबाखूच्या कारवाईत देवळीतील तीन दुकानदारांकडून पावणेसात लाखांचा माल जप्त करण्यात आला; मात्र या कारवाईत आर्थिक व्यवहार झाल्याची बोंब देवळीत सुरू आहे. कारवाई करताना अन्न व औषधी प्रशासन तथा पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे सापडलेल्या भांगेच्या गोळ्या फेकल्याचा आरोप शहरवासी करीत आहेत. त्या गोळ्या काही शहरवासीयांच्या हाती लागल्या आहेत. यामुळे शहरात चांगलाच गोंधळ उडाला आहे.
पोलिसांच्या दारूबंदी विशेष पथकाला येथे मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाखू असल्याची माहिती मिळाली. यावरून त्यांनी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत ही कारवाई केली; परंतु या कारवाई दरम्यान एका किराणा दुकानदाराने भांगेच्या गोळ्या असलेला डब्बा दुकानाच्या खिडकीतून बाहेर फेकल्याचे बोलले जात आहे. तर दुकानात सापडलेला उर्वरीत माल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्तीत दाखविला नसल्याचा आरोप आहे. दुकानदाराने खिडकीतून बाहेर फेकलेल्या भांगेच्या गोळ्या नागरिकांच्या हाती लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. या कारवाईत काही किराणा दुकानदारांना अन्न व औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आधीच सूचना देवून अभय दिल्याचीही चर्चा आहे. शहरातील अनेक दुकानात सुगंधीत तंबाखू व मादक पदार्थाची खुलेआम विक्री होत असून याकडे अन्न व औषधी प्रशासन विभागाची डोळेझाक होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या दारूबंदी विशेष पथकाने ही बाब उजेडात आणून कारवाईचा बडगा उगारला. यावेळी दोन दुकानदारांनी पोलिसांना आमिष दिले. यात पोलीस उपनिरीक्षक गजानन जाधव यांनी या दुकानदारांना चांगलाच चोप दिल्याची माहिती आहे; परंतु अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही संपूर्ण कारवाई सहज घेत शंकेला वाव दिला. या संपूर्ण प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होवून भांगेच्या गोळ्याची कारवाई टाळल्याची खमंग चर्चा आहे. याप्रकरणी वरिष्ठांनी लक्ष घालून खरा प्रकार उघडकीस आणावा, अशी शहरवासीयांची मागणी आहे.