श्वानांच्या हल्ल्यात अस्वल शावकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 21:43 IST2019-05-09T21:42:47+5:302019-05-09T21:43:39+5:30
येथील बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या न्यू बोर प्रकल्पात जंगली श्वानाच्या हल्ल्यात झुंज देताना चार ते पाच महिन्याच्या अस्वलाच्या मादी शावकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली असून या घटनेने वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

श्वानांच्या हल्ल्यात अस्वल शावकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरधरण : येथील बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या न्यू बोर प्रकल्पात जंगली श्वानाच्या हल्ल्यात झुंज देताना चार ते पाच महिन्याच्या अस्वलाच्या मादी शावकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली असून या घटनेने वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
तहानेने व्याकूळ झालेले अस्वलीचे शावक पाण्याच्या शोधात न्यू बोर व प्रादेशिक सीमेलगत असलेल्या न्यू बोरच्या कक्ष क्रमांक २८३ मधील वन तलावावर आले. तेवढ्यात अचानकपणे जंगली श्वांनांनी त्या चार ते पाच महिन्याच्या शावकावर हल्ला चढविला. या हल्ल्यात श्वानांशी झुंज देताना अस्वलीचा शावकाचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती न्यू बोर व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी लुचे यांनी दिली. घटना आज गुरुवारी सकाळी घटली असून दुपारी उघडकीस आली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
पाण्याअभावी जंगली श्वापदांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. पाण्याच्या शोधात काही जनावरे गावाकडेही धाव घेतांना दिसते. त्यामुळे नागरिकांच्याही जीवाला धोका असून जंगलात पुरेशी पाण्याची सोय नसल्याने लहान जनावरांनाही आपला जीवही गमवावा लागत असल्याचे या घटनेवरुन निदर्शनास आले आहे.