कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अधिक सजग व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:00:49+5:30

प्रतिबंधात्मक उपाययोजनांना अधिक सजगपणे राबविल्यास कठीण परिस्थितीवर मात करता येईल. या काळात सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आपत्ती व्यवस्थापनात काम करणाऱ्या प्रमुख विभागांना व अधिकाऱ्यांना गुरुवारी दिल्यात.

Be more vigilant to prevent the spread of corona | कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अधिक सजग व्हा

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अधिक सजग व्हा

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : व्हिडिओ कॉन्फरसद्वारे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : इतर जिल्हा, राज्यात अडकलेल्या लोकांच्या येण्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होऊ नये. कोरोनाबाधित सापडल्यास परिस्थिती आटोक्यात आणणे कठीण होते. त्यामुळे आपण दोन महिन्यांपासून राबवत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना अधिक सजगपणे राबविल्यास कठीण परिस्थितीवर मात करता येईल. या काळात सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आपत्ती व्यवस्थापनात काम करणाऱ्या प्रमुख विभागांना व अधिकाऱ्यांना गुरुवारी दिल्यात.
जिल्हाधिकाऱ्यांनी आठही तालुक्यातील अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले उपस्थित होते.
यावेळी डॉ. तेली आणि डॉ. ओंबासे यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेताना सर्वाधिक जास्त भर बाहेर जिल्हा, राज्यातून येणाऱ्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्याच्या बाबीवर दिला. सुमारे ४ हजार लोक मागील ४ दिवसांत जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तसेच यापुढेही येत राहतील. या सर्व लोकांचे संपूर्ण कुटुंब गृह विलगीकरण करावे. त्यांच्यावर लक्ष ठेवावे. त्यांच्या गृह विलगीकरणाच्या कालावधीत त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा घरपोच पुरवठा करण्यात यावा. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची माहिती तत्काळ मिळाल्यास त्यांना क्वारंटाईन करून पुढचा धोका टाळणे शक्य होईल, असे भिमनवार यांनी सांगितले.
जिल्ह्यात येणारे १६ मुख्य मार्ग आणि ९८ छुपे मार्ग यावर तैनात पथकाने स्वयंप्रेरणेने काम करावे. तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी सर्व सीमांवर काळजीपूर्वक निगराणी होते की नाही यावर लक्ष ठेवावे. या मार्गाने कोणीही विना परवानगी येता कामा नये, फिरत्या पथकाने कायम फिरत राहिल्यास अनधिकृत प्रवेशावर प्रतिबंध बसेल.
जिल्ह्यात जीवनावश्यक व इतर वस्तू घेवून येणारी वाहने आणि त्यामध्ये येणारी माणसे शहरात मिसळणार नाहीत, याची जास्त खबरदारी घेण्यात यावी. वाहनातील सामान अनलोडिंग तळावरच उतरणे आवश्यक आहे. कारवाई करण्याच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण केलेले आहे. त्यामुळे त्या-त्या विभागाने अधिकार वापरून कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्यात.
आरोग्य विभागाने तयार केलेल्या १,१५० आरोग्य पथकामार्फत तपासणी करताना ताप, सर्दी , खोकला याची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना वेगळे करून त्यांच्यावर लगेच उपचार करावेत. या पथकाकडून तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक यांनी माहिती घेऊन त्याचे विश्लेषण करावे आणि दररोज अहवाल द्यावा.
ग्रामीण भागात आरोग्य पथक जात असले तरी शहरी भागात हे पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे शहरी भागातील पथकाने हे काम जास्त जबाबदारीने करावे, कारण शहरी भागात बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, जिल्हा अधीषक कृषी अधिकारी अनिल इंगळे, सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा व आर्वीचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्यासह पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अरीक्षक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक यांनी ऑनलाईन सहभाग घेतला.

अत्यंविधीसाठी काटेकोर काळजी घ्या
जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या पाहता काही व्यक्तींना लक्षणे दिसल्यास लगेच रुग्णालयात दाखल करून त्याचे स्त्राव कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात येतात. त्यांचा चाचणी अहवाल यायचा असल्यास रुग्णालयाने केलेल्या सूचनांची माहिती कुटुंबीयांना दयावी. पार्थिव उघडणे, आंघोळ घालणे, हार घालणे, नमस्कार करणे अशा प्रकारचे कोणतेही काम होणार नाही, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, संबंधितांच्या कुटुंबीयांना लेखी पत्र देवून अंत्याविधीच्या सूचना द्याव्यात. तसेच संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधित रुग्णालयाने त्याची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला द्यावी, यामुळे पोलिसांनाही कारवाई करता येईल, असे डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले. कंटेंटन्मेट क्षेत्रात आत व बाहेर जाण्यासाठी एकच प्रवेशद्वार राहील, याची काळजी घ्यावी, असे पोलीस अधीक्षक म्हणाले. अत्यावश्यक सेवा देणाºया व्यक्तींना पासेस द्याव्यात, रात्री-अपरात्री वैद्यकीय कारणासाठी लोकांना सोडता येईल; मात्र त्यांची माहिती संबधित अधिकाऱ्यांना देण्यात यावी. बाहेरून येणारे लोक स्थानिक लोकांमध्ये मिसळणार नाही, याची दक्षता घेतल्यास आपण या आजारावर नक्की मात करू शकू, असा विश्वास व्यक्त केला.

Web Title: Be more vigilant to prevent the spread of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.