स्वाईन फ्लू आजाराला न घाबरता सावधानता बाळगा
By Admin | Updated: March 25, 2015 02:06 IST2015-03-25T02:06:53+5:302015-03-25T02:06:53+5:30
स्वाईन फ्लू हा आजार इतर फ्लू आजारासारखाच आहे. रूग्णांनी योग्य काळजी घेतल्यास यापासून होणारे दुष्परिणाम टाळता येतात.

स्वाईन फ्लू आजाराला न घाबरता सावधानता बाळगा
वर्धा : स्वाईन फ्लू हा आजार इतर फ्लू आजारासारखाच आहे. रूग्णांनी योग्य काळजी घेतल्यास यापासून होणारे दुष्परिणाम टाळता येतात. हा आजार एच १ एन १ या विषाणूमुळे होत आहे. ताप, खोकला, घशाला खवखव, अंगदुखी, जुलाब इत्यादी लक्षणे प्रामुख्याने आढळून येतात. या लक्षणाशिवाय छातीत दुखने, खोकल्यावाटे रक्त पडणे, रक्तदाब कमी होणे, नखे निळसर काळी होणे, मुलामध्ये चिडचिड व झोपाळूपणा आदी गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळून येतात. या आजाराला घाबरून न जाता, सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना यांनी केले आहे.
या आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ५ वर्षाखालील बालके, ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक, गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा इतर हदयरोगी, मधुमेहाचे रूग्ण, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड यांचे आजार असणाऱ्या व्यक्ती, चेतासंस्थेचे विकार कमी झालेल्या व्यक्ती, प्रतिकार शक्ती कमी झालेल्या व्यक्ती, दीर्घकाळ स्टीरॉईड औषधी घेणाऱ्या व्यक्तींना हा आजार अतिजोखमीचा ठरून गंभीर स्वरूपही धारण करू शकतो.
स्वाईन फ्लू हा आजार श्वसन संस्थेच्या आजार आहे. रूग्णाच्या सानिध्यात आल्याने होत असल्याने हा आजार टाळण्यासाठी नागरिकांनी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. यामध्ये वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावे, पौष्टिक आहाराचा वापर करावा, धुम्रपान टाळावे, पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी, भरपूर पाणी प्यावे, खोकताना, शिंकताना तोंडासमोर हातरूमाल धरणे अत्यावश्यक आहे.
ज्या कार्यक्रमात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात एकत्र येतील, असे उपक्रम शक्यतो टाळावेत. जेणेकरून संसर्गाचा प्रसार रोखता येईल. वर्ग सुरू करण्यापूर्वी विद्यार्थींमध्ये फ्लूच्या लक्षणांनी कोणी ग्रस्त नाही याची पाहणी करावी. फ्लूची लक्षणे आढळलेल्या विद्यार्थ्यांस ७ दिवस विश्रांती व जनसंपर्क टाळण्याचा सल्ला द्यावा.
लक्षणांची तीव्रता वाढल्यास वा प्रकृतीत बिघाड आढळून आल्यास त्वरित नजिकच्या आरोग्य संस्थेत कळवावे.
नागरिकांनी स्वाईन फ्लू या आजाराची भीती बाळगू नये. योग्य काळजी घेतल्यास हा आजार सहज टाळता येऊ शकतो. आजाराची लक्षणे आढळल्यास नजिकच्या आरोग्य केंद्रात उपचार करा, आपल्या जवळच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना त्याची माहिती द्यावी. स्वाईन फ्लू आजाराच्या नियंत्रणाकरिता जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचेही मिणा यांनी जनजागती उपक्रमांतर्गत सांगितले.(शहर प्रतिनिधी)