आर्थिकदृष्ट्या हतबल शेतकऱ्याला हवा शासनाचा आधार
By Admin | Updated: August 17, 2014 23:20 IST2014-08-17T23:20:01+5:302014-08-17T23:20:01+5:30
निसर्गावर अवलंबून असणाऱ्या बळीराजा पुढे खरीप हंगाम धोक्याची घंटा देत आहे. यामुळे रबीचा हंगामही लांबणार असल्याचे चित्र निर्माण होत आहे. यामुळे यंदाचा हंगाम गतवर्षीच्या

आर्थिकदृष्ट्या हतबल शेतकऱ्याला हवा शासनाचा आधार
घोराड : निसर्गावर अवलंबून असणाऱ्या बळीराजा पुढे खरीप हंगाम धोक्याची घंटा देत आहे. यामुळे रबीचा हंगामही लांबणार असल्याचे चित्र निर्माण होत आहे. यामुळे यंदाचा हंगाम गतवर्षीच्या हंगामाप्रमाणेच धोक्याचा तर ठरणार नाही ना अशी भीती शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे.
या महिन्यात खरीपातील कपाशी पात्या फुलावर राहायला हवी होती; पण पावसाच्या लहरीपणामुळे पिकाची वाढ खुंटली तर सोयाबीनला शेंगा लावण्याचा हा हंगाम होता. नुकत्याच गत १० ते १५ दिवसांपूर्वी पेरण्या झाल्या. अशात पावसाची दडी बसल्याने त्या धोक्यात आल्या.
सोयाबीन हे पीक पेरणीपासून पाऊस योग्य राहिल्यास ११० दिवसानंतर मळणी योग्य होते. यात जुलैच्या अखेरीस व आॅगस्टच्या पहिल्या सप्ताहात पेरण्या झाल्याने या पिकाची मळणी व सवंगणी नोव्हेंबरच्या अखेरीस व डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत; मात्र असाच पाऊस राहिल्यास लावलेला खर्चही निघेल अथवा नाही ही अपेक्षाही व्यर्थ आहे. त्यामुळे सोयाबीनच्या मळणी नंतर याच क्षेत्रात रबीत गहू व चणा हे पीक शेतकरी घेतात. त्यामुळे या पिकाच्या पेरण्या लांबल्यास डिसेंबरच्या शेवट व जानेवारीत पेरण्या झाल्यास गहू पिकाला लागणारा गारवा राहणार नाही. त्यामुळे रबीचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता शेतकरी वर्तवीत आहेत. या बरोबरच रबीही धोक्यात सापडणार या चिंतेने बळीराजाला ग्रासले आहे.
खरीप हंगामातील दुबार तिबार पेरणीच्या खर्चाने जवळ होता नव्हता पैसा निघून गेला. शेतातील पिकाकडे पाहताच हंगाम हातातून गेल्याचे दिसत आहेत. यामुळे अनेक अडचणीचा सामना बळीराजाच्या कुटुंबाला करावा लागतो. अशात इतर खर्च व येत्या दिवसात वैरणाची समस्या समोर येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यातून मार्ग काढण्याची चिंता शेतकऱ्यांसमोर आहे. (वार्ताहर)