‘लिंक फेल’मुळे बँकेचे व्यवहार तीन दिवसांपासून ठप्प

By Admin | Updated: August 24, 2014 00:10 IST2014-08-24T00:10:38+5:302014-08-24T00:10:38+5:30

नजीकच्या पवनार येथील सेंट्रल बँकेच्या शाखेतील व्यवहार लिंक नसल्याने तीन दिवसांपासून ठप्प आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे या बँकेची कामे संथगतीने होत असल्याने आधीपासूनच

'Bank failure due to link failure has been stalled for three days | ‘लिंक फेल’मुळे बँकेचे व्यवहार तीन दिवसांपासून ठप्प

‘लिंक फेल’मुळे बँकेचे व्यवहार तीन दिवसांपासून ठप्प

वर्धा : नजीकच्या पवनार येथील सेंट्रल बँकेच्या शाखेतील व्यवहार लिंक नसल्याने तीन दिवसांपासून ठप्प आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे या बँकेची कामे संथगतीने होत असल्याने आधीपासूनच नागरिक त्रस्त होते. तीन दिवसांपासून लिंक फेल, चा फटका बसल्याने ग्राहकांना व शेतकरी वर्गाला त्रास होत आहे.
गावची लोकसंख्या १० हजारांच्या घरात असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात व्यवहार या बँकेमार्फत चालतात. बँकेत नागरिकांची कामे लवकर होत नसल्याची ओरड नेहमीच होत आहे. त्यातच तीन दिवसांपासून लिंक फेलच्या कारणातून सारे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. पवनार येथील सेंट्रल बँकेच्या शाखेसोबत गावासह कान्हापूर, मोर्चापूर, गोंदापूर, वाहितपूर, सुकळी(स्टेशन), रमणा तसेच परिसरातील विविध गावांतल्या शेतकऱ्यासह विविध नागरिकांचे आर्थिक व्यवहार चालतात. त्यामुळे या बँकेच्या शाखेत ग्राहकांची नेहमीच गर्दी असते. परंतु मागील तीन दिवसांपासून बँकेची लिंक नसल्यामुळे व्यवहार ठप्प झाले आहे. यामुळे नागरिकांची तातडीची पैशाची कामेही अडली आहेत. पवनार येथील एका शेतकऱ्याला ट्रॅक्टर चालान केल्यामुळे न्यायालयात ७० हजार रुपये भरायचे होते. तो २१ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता बँकेत पैसे काढण्यासाठी गेला असता त्याला लिंक नसल्यामुळे आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. असे बँकेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले. माझी रक्कम तुमच्याच बँक शाखेत आहे. दुसरीकडे माझे खाते नाही, त्यामुळे मी वेळेवर पैसे कोठून आणावे, असे या ट्रॅक्टरमालक शेतकऱ्याने बँकेतील कर्मचाऱ्यांना विनवणी करीत सांगितले. पण बँक कर्मचारी शेतकऱ्याचे म्हणणे ऐकूण घेत नव्हते. शेतकऱ्याला बँकेच्या वर्धा शाखेतून रक्कम काढण्याची तजवीज करून देणे गरजेचे होते. पण तशी व्यवस्थाही येथील शाखेने करून दिली नाही. शेवटी त्या शेतकऱ्याला सोने गहाण ठेवून रक्कम भरावी लागली. एका विद्यार्थिनीला तिच्या नवीन अभ्यासक्रमाचे प्रवेश शुल्क भरण्यासही लिंक फेलमुळे पैसे मिळाले नाही.
या शाखेत लिंक नसणे, ही नित्याचीच बाब झाली आहे. यामुळे महिन्यातील बरेच दिवस एटीएमही बंद राहाते. याबाबत विचारले असता कर्मचारी आम्ही काहीच करू शकत नाही लिंक आली म्हणजे आपोआप सुरू होईल असे सांगतात. इतकेच नाही तर या बँकशाखेत व्यवस्थापक, कॅशिअरसह फक्त चार कर्मचारी आहेत, कमी संख्येमुळे कामाच्या गतीवर विपरित परिणाम होतो. यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. ग्राहकांचे ताटकळत राहणे ही नित्याचीच बाब झाल्याने ग्राहकांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो.
एवढ्या मोठ्या गावाचा कारभार चालवणाऱ्या बँकेत फक्त चार कर्मचारी आहे. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून दुसरी शाखा सुरू करण्याची मागणी करीत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ग्राहकांची समस्या तत्काळ दूर करावी व मनस्ताप दूर करावा, अशी ग्राहकांची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: 'Bank failure due to link failure has been stalled for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.