तोकड्या सुविधांमुळे बँक ग्राहक त्रस्त
By Admin | Updated: July 19, 2015 02:14 IST2015-07-19T02:14:44+5:302015-07-19T02:14:44+5:30
येथील सहकारी बँकेच्या शाखेत मागील दोन वर्षांपासून आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. यामुळे स्थानिक बँक आॅफ इंडियाच्या शाखेत ग्राहकांची आर्थिक व्यवहारासाठी मोठी गर्दी होते.

तोकड्या सुविधांमुळे बँक ग्राहक त्रस्त
अनेक कामे प्रभावित : नागरिकांची होतेय गैरसोय
रोहणा : येथील सहकारी बँकेच्या शाखेत मागील दोन वर्षांपासून आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. यामुळे स्थानिक बँक आॅफ इंडियाच्या शाखेत ग्राहकांची आर्थिक व्यवहारासाठी मोठी गर्दी होते. बँकेतील तोकडा कर्मचारी वर्ग व शाखा इमारतीतील असुविधा यामुळे आणखी एका राष्ट्रीयकृत बँकेची शाखा स्थापन करावी, अशी मागणी होत आहे.
गावातील पाच हजारांच्या वर खातेदारांसाठी व आसपासच्या बोदड, बोथली, चोरांबा, गौरखेडा, पांजरा, दिघी, सायरखेडा, वडगाव, वाई, पिंपळधारी, सालदरा आदी गावांतील सुमारे सात हजारांवर नागरिकांचे खाते येथील बँक आॅफ इंडिया शाखेत आहे. ही बँक ग्रा.पं. कार्यालयाच्या पहिल्या माळ्यावर अत्यंत तोकड्या जागेत कार्यरत आहे. शासकीय योजनांतील सर्व व्यवहार बँकेतूनच होत असल्याने ग्राहकांची संख्या वाढत आहे. विविध कर्जाच्या वितरणाचे वाढते काम व अपूरा अधिकारी, कर्मचारी वर्ग यामुळे ग्राहक, कर्मचाऱ्यांत अनेकदा वाद होतात. लिंक फेलचा प्रकार नित्याचा असून गर्दी झाल्यावर बँकेचे दार बंद करणे, माहिती न देणे आदी प्रकार घडतात. याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे आहे.(वार्ताहर)