केळी उत्पादकांना भावात 300 रुपयांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 05:00 IST2020-12-18T05:00:00+5:302020-12-18T05:00:19+5:30
संपूर्ण महाराष्ट्रात एकेकाळी दर्जेदार केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सेलू तालुक्यात दिवसेंदिवस केळीचे लागवड क्षेत्र घटत आहे. भावबाजीचा फटका व वाढता उत्पादन खर्च यामुळे पुढे केळीच्या लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता कृषितज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. यंदा मार्च महिन्यात चारशे रुपये, एप्रिल महिन्यात चारशे पन्नास रुपये, मे व जून महिन्यात पाचशे, जुलैमध्ये सहाशे, ऑगस्ट तसेच सप्टेंबर महिन्यात सातशे तर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात आठशे रुपये क्विंटल केळीला भाव होता.

केळी उत्पादकांना भावात 300 रुपयांचा फटका
प्रफुल्ल लुंगे
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : केळी उत्पादनासाठी विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील केळी उत्पादकांच्या अडचणीत सध्या भावबाजीमुळे मोठी भर पडली आहे. सध्या केळीच्या दरात प्रतिक्विंटल ३०० रुपयांनी घसरण आल्याने या भागातील केळीच्या बागा भविष्यात नामशेष होण्याची भीती वर्तविली जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात एकेकाळी दर्जेदार केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सेलू तालुक्यात दिवसेंदिवस केळीचे लागवड क्षेत्र घटत आहे. भावबाजीचा फटका व वाढता उत्पादन खर्च यामुळे पुढे केळीच्या लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता कृषितज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. यंदा मार्च महिन्यात चारशे रुपये, एप्रिल महिन्यात चारशे पन्नास रुपये, मे व जून महिन्यात पाचशे, जुलैमध्ये सहाशे, ऑगस्ट तसेच सप्टेंबर महिन्यात सातशे तर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात आठशे रुपये क्विंटल केळीला भाव होता. पण डिसेंबर महिन्यात तीनशे रुपयांनी भाव कमी होत केळीचे दर पाचशे रुपये प्रतिक्विंटलवर आले आहे. भावातील या घसरणीचा सध्या मोठा आर्थिक फटका केळी उत्पादकांना सोसावा लागत आहे. काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा केळीच्या बगीच्याची तोड झाली की पूर्ण घडाचे काट्यावर वजन केले जायचे. तर आता घड कापला की त्याच्या वेगवेगळ्या फण्या केल्या जातात व कॅरेटमध्ये केळी भरून बाजारात विक्रीसाठी पाठविली जाते.
विविध प्रक्रिया केल्यानंतर ही केळी नागपूर, हिंगणघाट, उमरेड, बुटीबोरी, वर्धा आदी ठिकाणी पोहोचविली जाते.
एकट्या सेलूत तीन रॅपनिंग सेंटर आहे. अशोक दंडारे, मनोज बोबडे व दीपक तडस या केळी बागायतदारांनी ते काही वर्षांपूर्वी सुरू केले आहे.
उत्पादन खर्चच अधिक
केळीचे पीक हे सरासरी १५ ते १८ महिन्यांचे असून एका एकरात सुमारे सतराशे झाडे बसतात. असे असले तरी लागवडीपासून पीक हाती येईपर्यंत या पिकाची योग्य निगा घ्यावी लागते. त्यानंतर हा शेतमाल बाजारपेठेत विकला जातो. पण सध्याच्या दराच्या तुलनेत उत्पादन खर्चच अधिक असल्याचे शेतकरी सांगतात.
मोजक्याच गावात बागा
सेलू तालुक्यातील रेहकी, वडगाव, कोटंबा, खापरी, शिवणगाव, किन्ही, मोही, हिंगणी, सुकळी धानोली अशा मोजक्याच गावात सध्या केळीच्या बागा शिल्लक राहिल्या आहेत. लागवड क्षेत्र घटत असल्याने भविष्यात बागा नामशेष होतील की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
केळी पिकाची खूप काळजी घ्यावी लागते. शिवाय उत्पादन खर्चही बऱ्यापैकी लागतो. मात्र, भाव स्थिर राहात नाही. इतर पिकांच्या लागवडीसाठी हा पैसा हातात येतो. त्यामुळे अडचण जाणवत नाही. खूप फायदा नसला तरी समाधान आहे.
-कमलाकर झाडे, केळी उत्पादक, रेहकी.
केळीच्या पिकाचा सरासरी कालावधी दीड वर्षांचा आहे. भावबाजी चांगली मिळाली तर परवडते अथवा नाही. मात्र, शेतात गेल्यावर हिरवीकंच केळीची बाग पाहून वेगळा आनंद मिळतो.
- श्यामसुंदर बोबडे, केळी उत्पादक, वडगाव (कला).
केळीच्या बागा पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्या आहेत. शेतकऱ्यांकडून घेतलेल्या मालाची वर्गवारी करून तो मला रॅपनिंग सेंटरमध्ये तयार करून आम्ही तो ठोक विक्रेत्याकडे पाठवितो.
- मनोज बोबडे, रॅपनिंग सेंटर मालक, सेलू.