केळी पिकालाही विम्याचे कवच
By Admin | Updated: January 25, 2016 03:25 IST2016-01-25T03:25:36+5:302016-01-25T03:25:36+5:30
फळ पीक विमा योजनेत अंबिया बहारचा समावेश होता; पण आता केळी या पिकाचाही फळ पीक विमा योजनेत समावेश

केळी पिकालाही विम्याचे कवच
वर्धा : फळ पीक विमा योजनेत अंबिया बहारचा समावेश होता; पण आता केळी या पिकाचाही फळ पीक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विम्याचे संरक्षण व बाजारपेठ नसल्याने जिल्ह्यातील केळीच्या बागा नामशेष झाल्या; पण विम्याचे कवच असल्याने केळी बागायतदारांच्या सेलू तालुक्याला उभारी मिळणार आहे.
२०१५-१६ या वर्षात आंबिया बहारामध्ये इतर फळ पिकांबरोबर केळीचा समावेश करण्यात आला आहे. केळी पिकासाठी कमी तापमान, वेगाचा वारा व अधिक तापमान हे हवामान धोके ठरविण्यात आले आहेत. त्या-त्या धोक्याच्या कालावधीनुसार निश्चित विमा अनुदानही निश्चित करण्यात येत आहे. यातील वेगाचा वारा या हवामान धोक्याबाबत मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. यात नुकसानग्रस्त केळी पिकांच्या नुकसानीची विमा कंपनी, महसूल आणि कृषी विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर निश्चिती करावयाची आहे. यासाठी त्या महसूल मंडळातील संदर्भ हवामान केंद्रावर ४० किमी प्रती तास वा त्यापेक्षा अधिक वेगाने वारे वाहिल्याची नोंद होणे गरजेचे आहे. केवळ संदर्भ हवामान केंद्रावर वेगाच्या वाऱ्याची नोंद नुकसान भरपाईसाठी पात्र ठरणार नाही. वैयक्तिक पातळीवर वेगाच्या वाऱ्यामुळे होणाऱ्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
स्वयंचलीत हवामान केंद्रांची महसूल मंडळनिहाय यादी व ठिकाण याचा सविस्तर तपशील भारतीय कृषी विमा कंपनीने सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना ३० जानेवारी पूर्वी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. स्वयंचलित हवमान केंद्रे सुस्थितीत आहे वा नाही, याची पाहणी उपविभागीय स्तरावरील समितीला १० फेब्रुवारीपूर्वी करावी लागणार आहे. किमान १० टक्के स्वयंचलित हवामान केंद्रांची तपासणी विभाग स्तरावरील समिती करणार आहे. स्वयंचलित हवामान केंद्रात असणाऱ्या त्रुटींची पूर्तता हवामान केंद्रे बसविलेल्या संस्थेकडून विमा कंपनीने २५ फेब्रुवारीपूर्वी करायची आहे.
नुकसानीची पाहणी करण्यासाठी तयार केलेल्या पंचनाम्याचे प्रपत्राच्या भारतीय कृषी विमा कंपनी सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना १५ फेब्रुवारीपूर्वी उपलब्ध करून देतील. शासनाच्या संकेतस्थळावरही ही प्रपत्रे उपलब्ध राहणार आहे. स्वयंचलित हवामान केंद्रावर नोंद झालेल्या वेगाच्या वाऱ्याची माहिती वेळेवर सर्व संबंधितांना द्यावी लागेल.
स्वयंचलित हवामान केंद्रावर त्या महसूल मंडळात वेगाच्या वाऱ्याची नोंद झाल्याची खात्री संबंधित विमा कंपनीलाच करून घ्यायची आहे. फळ पीक विमा योजनेतील केळी पिकासाठी ४० किमी वा त्यापेक्षा अधिक वेगाच्या वाऱ्याची नोंद झाल्यास शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. नुकसान होताच ४८ तासात नुकसानीचा दिनांक, वेळ, कारण, प्रकार व प्रमाण याची माहिती विमा कंपनीस कळविणे गरजेचे आहे. विमा कंपनीचे कार्यालय प्रत्येक ठिकाणी नसल्याने कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यामार्फत तालुका कृषी अधिकाऱ्यांना माहिती दिली तरी ती ग्राह्य धरली जाणार आहे.
यानंतर अनुदानासाठी गाव कामगार, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व विमा कंपनी प्रतिनिधी यांनी एकत्रितरित्या अर्ज मिळाल्यवर ७ दिवसांच्या आत प्रत्यक्ष भेट देत पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विमा कंपनीचे प्रतिनिधी नसल्यास उर्वरित सदस्यांनी पंचनामा करायचा आहे. सदर पंचनाम्यास मान्यता देणे बंधनकारक आहे. या विम्याच्या संरक्षणामुळे आर्वी व सेलू तालुक्यातील केळीचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
विमा संरक्षण प्रकार आणि कालावधी
४१ मार्च ते ३१ जुलै दरम्यान एकापेक्षा अधिक वेळा वेगाचा वारा हा धोका निर्माण झाला आणि नुकसान भरपाई द्यायची झाल्यास कमाल नुकसान भरपाई देय राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यात कमाल देय नुकसान भरपाईची रक्कम ५० हजार रुपये ठरविण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना धोक्यातून बचावलेले पीक आणि विम्याची रक्कम हाती लागणार असल्याने अधिक नुकसान सोसावे लागणार नाही.
४८ तासांत माहिती गरजेची
४विमा संरक्षित कालावधीत कोणत्याही दिवशी ४० किमी प्रती तास वा त्यापेक्षा अधिकवेगाने वारा वाहिल्याची नोंद झाल्यास सदर महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान झाल्यापासून ४८ तासांत नुकसानग्रस्त केळी पिकाची माहिती विमा कंपनीस कळवावी लागणार आहे. यानंतर विमा कंपनी, जिल्हा महसूल व कृषी विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चत केले जाईल. वैयक्तिक पातळीवर नुकसान भरपाई ठरविण्यासाठी त्या महसूल मंडळातील संदर्भ हवामान केंद्रावर ४० किमी प्रती तास वा त्यापेक्षा वेगाने वारे वाहिल्याची नोंद गरजेची आहे. वैयक्तिक नुकसान भरपाई प्रत्यक्ष पाहणी करून त्या प्रमाणात देण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
विमा संरक्षणामुळे निश्चितच केळी पिकाची लागवड वाढेल. महसूल मंडळात किमान २० हेक्टरमध्ये केळीची लागवड असणे फळ पीक विम्यासाठी आवश्यक आहे. आर्वी तालुक्यात काही शेतकऱ्यांना या विम्याचा लाभ मिळाला आहे. नवीन यादीप्रमाणे काही शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळेल.
- ज्ञानेश्वर भारती, अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.