भदाडी नदीवरील बंधारा फोडला
By Admin | Updated: February 11, 2015 01:46 IST2015-02-11T01:46:35+5:302015-02-11T01:46:35+5:30
भदाडी नदीवर बांधण्यात आलेला बंधारा या भागातील एका शेतकऱ्याने दहा दिवसांपूर्वी तोडल्याचे रविवारी समोर आले.

भदाडी नदीवरील बंधारा फोडला
वर्धा : भदाडी नदीवर बांधण्यात आलेला बंधारा या भागातील एका शेतकऱ्याने दहा दिवसांपूर्वी तोडल्याचे रविवारी समोर आले. या बंधाऱ्यामुळे त्याच्या शेतात पाणी जाण्याची भीती असल्याने त्याने तो तोडल्याची माहिती आहे. बंधारा तुटल्याने येथील शेतकऱ्यांच्या ओलिताची समस्या निर्माण झाली आहे. याकडे संबंधीत विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे.
सोनेगाव मार्गावरील भदाडी नदीवर भुजल विभागाने २००५-०६ च्या दरम्यान सिमेंटचा पक्का बंधारा बांधला होता. या बंधाऱ्यामुळे ग्राम पंचायतीच्या नळयोजनेच्या विहिरीला पाणी आले. सोबतच शेतातील विहिरींची पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. शिवाय या भागातील शेतकऱ्यांना ओलिताचीही सोय झाली. हा बंधारा बांधल्यानंतर तो ग्रामपंचायतीला हस्तांतरीत करण्यात आला. हा बंधारा १० दिवसांपूर्वी या भागातील एका शेतकऱ्याने तो फोडला. हा बंधारा फोडल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी वायगाव (नि.) येथील सरपंचाला दिली. याबाबत सरपंचानी तहसील, जिल्हा परिषद व पोलीस ठाण्याला लेखी स्वरुपात माहिती दिल्याचे सांगितले असले तरी हा बंधारा कोणाचा याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले.
सरपंच गणेश वांदाडे हे गत १२ वर्षांपासून ग्राम पंचायत सदस्य आहेत. असे असतानाही ते या बंधाऱ्याबाबत अनभिज्ञ असल्याने नवल व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्यकाळातच हा बंधारा भूजल विभागाने लाखो रुपये खर्चून बांधला आणि त्या नंतर ग्रामपंचायतीला हस्तांतरीत केला होता. मात्र सरपंचाला याबाबत माहिती नाही की माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शेतकऱ्यांकरिता लाभाचा ठरणारा हा बंधारा शेतकऱ्याने फोडला असूनही त्याच्यावर कारवाई नाही. वायगाव ग्रामपंचायतीला याबाबत माहिती देऊनसुद्धा त्यांच्याकडून बंधाऱ्याची पाहणी करण्यात आली नाही. या बाबत या भागातील शेतकऱ्यांना विचारणा केली असता या शेतकऱ्याला राजकीय नेत्याचे पाठबळ असल्याचे बोलले जात आहे.
लाखो रुपयाचा बंधारा फोडल्यावर त्यावर दहा दिवस होवून सुद्धा कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. भूजल विभागाने वायगाव (नि.) ग्रामपंचायतीला सूचना दिल्या होत्या की संबंधित शेतकऱ्याविरोधात तक्रार द्यावी; मात्र अजूनही तक्रार देण्यात आली नाही. यामुळे विविध चर्चेला पेव फुटले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)
शासनाच्या पाणी अडवा पाणी जिरवा योजनेला हादरा; बंधाऱ्याचा निधी गेला वाया
शासनामार्फत पाण्याच्या बचतीवर मोठ मोठ्या योजना राबविल्या जात आहे. यात जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण राज्यात जलयुक्त शिबिर राबविण्यात येत आहे. यात गावाकऱ्यांचा व शेतकऱ्यांचा सहभाग अनिवार्य करण्यात आला आहे. यावर शासन कोटयवधी रुपये खर्च करीत आहे. तर दुसरीकडे उपलब्ध असलेल्या पाणी साठवण बंधाऱ्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अस्तित्वात असलेला बंधारा तोडणाऱ्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.
भूजल विभागाने ग्राम पंचायतीला बंधारा हस्तांतरीत केला होता. बंधारा फोडल्याची माहिती भूजल विभागाला देण्यात आली असून त्यांनी सदर संबंधीत शेतकऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला दिल्याची माहिती आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप कुठलीही तक्रार करण्यात आली नाही.
मी सदस्य असताना मौजा वायगाव (नि.) येथील भदाडी नदीवर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीजवळ विहिरीच्या पाण्याचे स्त्रोत वाढावे व परिसरातील शेतकऱ्यांना ओलीत कराता यावे, याकरिता २००५-०६ मध्ये भूजल विभागांतर्गत सिमेंटचा बंधारा करण्यात आला होता. परंतु समाजकंटकाने राजकीय लोकांचे पाठबळ घेऊन तो बंधारा तोडला. काही शेतकऱ्यांना त्या बंधाऱ्यापासून अडथळा निर्माण झाला असता तर त्याची तक्रार ग्रामपंचायत किंवा भूजल विभागाकडे तक्रारी असत्या, मात्र तसे झाले नाही. बंधाऱ्यापासून शेतकऱ्यांना व जनावरांना पाण्याच्या त्रासाला समोरे जावे लागणार आहे.
- राजेंद्र गुलाबराव उघडे, माजी पं.स. सदस्य व राजीव गांधी
निराधार योजना अध्यक्ष वर्धा
आमच्या विभागामार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी व ग्रामपंचायतची पाणीपुरवठा विहीर असल्याने सिमेंटचा बंधारा २००५-०६ च्या दरम्यान बांधला होता. बांधकामानंतर बंधारा वायगाव (नि.) ग्रामपंचायतीला हस्तांतरीत करण्यात आला. मात्र बंधारा फोडल्याची माहिती मिळाल्यावर संबंधित शेतकऱ्याविरोधात पोलिसांना तक्रार देण्याची सूचना ग्रामपंचायतीला दिली होती.
- नितीन महाजन, वरिष्ठ भू-वैज्ञानिक, भूजल विभाग, वर्धा
बंधारा कोणत्या विभागाचा आहे, याबाबत माहिती नाही. मात्र मला माहिती मिळाल्यावर मी. जि.प., तहसील, व पोलीस स्टेशनला लेखी निवेदन दिले आहे. त्यांच्याकडून कुठलीही कारवाई झाली नाही.
- गणेश वांदाडे, सरपंच वायगाव (नि.)