अस्ताव्यस्त वाहतुकीने शहराचा कोंडमारा

By Admin | Updated: December 18, 2014 02:03 IST2014-12-18T02:03:48+5:302014-12-18T02:03:48+5:30

जिल्ह्यातील आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या हिंगणघाट शहराला सध्या अस्ताव्यस्ततेचे स्वरूप आले आहे.

Awkward traffic in the city | अस्ताव्यस्त वाहतुकीने शहराचा कोंडमारा

अस्ताव्यस्त वाहतुकीने शहराचा कोंडमारा

वर्धा : जिल्ह्यातील आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या हिंगणघाट शहराला सध्या अस्ताव्यस्ततेचे स्वरूप आले आहे. लोकसंख्या वाढत असल्याने अस्ताव्यस्त वाहतुकीने शहरातील वाहतुकीचा कोंडमारा होत आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण व्यवस्था पांढरा हत्ती ठरत असल्याचा आरोप शहरातील जनसमस्या निवारण कृती समितीने केला असून व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस उपायोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
शरात प्रवेश करणारा हिंगणघाट-नागपूर मुख्यमार्ग हा सा.बां. विभागांंतर्गत येतो. वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी ही पोलीस विभागाची आहे. परंतु शहरातील वाहतुक नियंत्रण व्यवस्था पूर्णत: ढेपाळली असून रहदारी मार्गावरील अतिक्रमण, अस्ताव्यस्त वाहतूक, अस्ताव्यस्त पार्किंग यामुळे अडथळे निर्माण होऊन अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे.
शहरातील नागपूर मार्गावर हरिओम सभागृह, कापसे इंजि. वर्कशॉप व लक्ष्मी मंगल कार्यालय असून लग्न समारंभाकरिता येणाऱ्यामुळे आणि सभागृहांनी केलेल्या अतिक्रमणामुळे संपूर्ण मार्ग अडविल्या जातो. मागील चार-पाच वर्षापासून सतत हा प्रकार सुरू असल्यामळे अपघात वाढल्याचा आरोप समितीने केला आहे.
शहरातील नाल्या, गटारे आदींची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी काविळ, डेंग्यू अशा आजाराची लागण होत आहे. यावर स्वास्थ्य विभाग ठोस कारवाई करीत नसल्याने आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरात बेवारस मोकाट जनावरे व कुत्रे यांची फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून शहरातील मुख्य रोड तसेच अन्य भागात रोडवर फिरणे, बसणे, घाण करणे यामुळे वातावरण दूषित होण्यास वाव मिळत आहे. जनावरे रोडवर बसून राहात असल्याने रहदारीस पूर्णत: अडथळा निर्माण होत असून सतत अपघात होणे ही बाब आता नित्याची झाली आहे. यावर उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले असून नगर परिषद जाणीवपूर्ण दुर्लक्ष करून जनतेच्या जीविताशी खेळी करीत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.
या समस्यांबाबत निवेदने व सूचना करूनही संबंधित अधिकारी कोणतीही कार्यवाही करीत नाही. त्यामुळे नागरिकांमधील असंतोष दिवसेंदिवस वाढत आहे. याकरिता उपरोक्त समस्यांची त्वरित दखल घेऊन कार्यवाही करून न्याय देण्यात यावा, अशी मागणी जनसमस्या निवारण कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. तसेच निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्ह्याचे खासदार, क्षेत्राचे आमदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आदींना सादर केल्या आहे.
औद्योगिकदृष्ट्या हिंगणघाट हा महत्त्वपूर्ण तालुका आहे. शहरातील अवजड वाहनांची वर्दळ सतत वाढत आहे. असे असतानाही वाहतूक व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याने शहराचा कोंडमारा होत आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Awkward traffic in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.