रपटा खरवडून गेल्याने वहिवाटीस अडथळा
By Admin | Updated: August 21, 2016 00:42 IST2016-08-21T00:42:45+5:302016-08-21T00:42:45+5:30
पावसामुळे आलेल्या पुरात नाल्यावरील रपटा वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांच्या बैलगाडीची वहिवाटच बंद झाली आहे.

रपटा खरवडून गेल्याने वहिवाटीस अडथळा
आकोली : पावसामुळे आलेल्या पुरात नाल्यावरील रपटा वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांच्या बैलगाडीची वहिवाटच बंद झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना अत्यंत अरूंद जागेतून वाट काढावी लागत असून अपघाताचा धोका बळावला आहे.
तामसवाडा ते रिधोरा मार्गावरून जाणाऱ्या पांदण रस्त्यावरील रपटा पुरामुळे खरवडून गेला आहे. यामुळे ७० शेतकऱ्यांना हाल सहन करावे लागत आहे. सध्या शेतपिकांना रासायनिक खत देण्यात येत आहे. रपटा खरडल्याने तामसवाडा गावातील शेतकऱ्यांना मात्र दोन ते तीन किमी अंतर डोक्यावर खत वाहून न्यावे लागत आहे. यामुळे रपटा कधी दुरूस्त होणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
तामसवाडा ते रिधोरा हा मार्ग गावातून शेतात जाणारा जवळचा मार्ग आहे; पण पुर्ती सिंचन कालव्याच्या खोलीकरणामुळे नाल्यातून ये-जा करता येत नाही. यामुळे सदर रस्त्याशिवाय वहिवाटीस अन्य मार्ग नाही. परिणामी, शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. बैलगाडी शेतात जात नसल्याने खत नेता येत नाही. शेतातून गवताचे भारेही आणता येत नाही. सर्व साहित्य डोक्यावर घेऊन शेतात जावे लागते. यात शेतकऱ्यांची दमछाक होत असल्याचे दिसते. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत रपटा दुरूस्त करावा, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)