कोजागिरी संगीतसंध्येत रंगले श्रोते
By Admin | Updated: October 15, 2014 23:23 IST2014-10-15T23:23:10+5:302014-10-15T23:23:10+5:30
जय महाकाली शिक्षण संस्था, अग्निहोत्री ग्रुप आॅफ इन्स्ट्यिुशन्स, वर्धाद्वारे मंगळवारी सायंकाळी ७ वाजता बाबुलाल अग्निहोत्री शैक्षणिक परिसर नागठाणा रोड, सिंदी मेघे वर्धा येथील अग्निहोत्री

कोजागिरी संगीतसंध्येत रंगले श्रोते
वर्धा : जय महाकाली शिक्षण संस्था, अग्निहोत्री ग्रुप आॅफ इन्स्ट्यिुशन्स, वर्धाद्वारे मंगळवारी सायंकाळी ७ वाजता बाबुलाल अग्निहोत्री शैक्षणिक परिसर नागठाणा रोड, सिंदी मेघे वर्धा येथील अग्निहोत्री आॅडिटोरियममध्ये कोजागिरी सुरमयी शाम हा संगीत संध्या कार्यक्रम घेण्यात आला. मुंबईचे प्रख्यात गीत, गझल, भजन व जसगायक रविराज यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थाध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी कोजागिरीचे पौराणिक महत्त्व विषद केले. मंचावर चंद्रपूर येथील माजी नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी ऊर्फ धन्नू महाराज, संस्था सचिव शिवकुमारी अग्निहोत्री, डॉ. अशोक जैन, बाबाराव महाजन उपस्थित होते. कोजागिरी सुरमयी शामची रंगत प्रख्यात गायक रविराज यांच्या सुरेल स्वरांनी रंगली. सुरुवातीलाच कोजागिरीचे औचित्य साधून रविराज यांनी एक राधा एक मीरा... दोनों ने शाम को चाहा हे गीत सादर करून वातावरणात रंगत आणली. यानंतर खाली मेरी घागर... बडी देर भयी तसेच अशांती चित्रपटातील शक्ती दे मॉ.. शक्ती दे माँ अशी एकाहून एक गाणी सादर केली. तसेच काल के पंजे से माता बचाओ, सच्ची ज्योत वाली माता तेरी जय जयकार... तुने मुझे बुलाया शेरोवाली ये या गाण्यावर उपस्थित श्रोते टाळ्यांच्या निनादात एकरूप झाले.
एकापेक्षा एक अशी विविध प्रकारची गाणी सादर करून उपस्थितांकडून दाद मिळविली. नुसरत फतेह अली खान यांचे कितना सोना तेनु, गुलाम अलींची चुपके चुपके रात दिन, आसू बहाना याद है ही गझल, तर जगजितसिंग यांच्या खास शैलीत झुकी झुकी सी नजर... बेकरार है के नही अशा गझलांनी रसिकांना भावविभोर केले.
हिंदी गीतासोबतच मराठी गझल सम्राट स्व. सुरेश भट यांची हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही ही गझल जरा जास्तच भाव खाऊन गेली. शेवटच्या टप्प्यात विख्यात शास्त्रीय गायक मन्ना डे यांना स्मरण करून गाणी सादर करण्यात आली. दमा दम मस्त कलंदर या गीतानंतर राष्ट्रगीत सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी कोजागिरीचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाला शहरातील प्राध्यापक व शिक्षकवृंद व नागरिकांची व महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)