विकासाच्या आधुनिक संकल्पनेसाठी प्रयत्न गरजेचे
By Admin | Updated: July 31, 2014 00:11 IST2014-07-31T00:11:28+5:302014-07-31T00:11:28+5:30
विकासाची आधुनिक संकल्पना जनजातीच्या क्षेत्रापर्यंत पोहोचण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न झाले पाहिजे़ माहितीच्या विस्फोटाचा लाभ अशा भागाला मिळण्यासाठी तेथे माहिती़,

विकासाच्या आधुनिक संकल्पनेसाठी प्रयत्न गरजेचे
वर्धा : विकासाची आधुनिक संकल्पना जनजातीच्या क्षेत्रापर्यंत पोहोचण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न झाले पाहिजे़ माहितीच्या विस्फोटाचा लाभ अशा भागाला मिळण्यासाठी तेथे माहिती़, संचार आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढविला पाहिजे, असे प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलसचिव प्रा़ देवराज यांनी केले़
संचार व मीडिया अध्ययन केंद्राच्यावतीने ‘शिक्षणात माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रयोग’ या विषयावर शिक्षकांकरिता २८ जुलै ते ३ आॅगस्ट दरम्यान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले़ या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ कार्यशाळेला मुख्य वक्ते म्हणून वरिष्ठ शिक्षण प्रशिक्षक नवेन्दु महोदय इंदोर, भारतीय जनसंचार संस्था नवी दिल्लीचे माजी अभ्यासक्रम निदेशक प्रा़ प्रदीप माथूर, वरिष्ठ दृक-श्राव्य संचालक डॉ़ किशोर वासवानी अहमदाबाद, मानविकी तसेच सामाजिक विज्ञान विद्यापीठाचे प्रा़ अनिलकुमार राय आदी उपस्थित होते़
यावेळी डॉ़ वासवानी म्हणाले की, अध्यापनात संचारच्या विविध साधनांचा उपयोग केला पाहिजे़ विविध हिंदी चॅनल व धारावाहिकांचा उल्लेख करून ते म्हणाले की, हिंदीचे मार्केट तीव्र गतीने वाढत आहे आणि यातून वर्षाकाठी दोन हजार कोटी रुपये प्राप्त होत आहेत़ प्रा़ प्रदीप माथूर यांनी देशात मिडीयाचा बोलबाला असला तरी अद्यापही ५० टक्के लोकसंख्या मिडीयापासून दूरच आहे़ राज्याच्या सीमा विस्तारायला हे ज्ञान माहिती, संचार आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविले पाहिजे, असे सांगितले़
याप्रसंगी नवेन्दु महोदय यांनीही विचार व्यक्त केले़ मान्यवरांचा सत्कार प्रा़ अनिलकुमार राय यांनी केला़ कार्यक्रमाचे संचालन सहायक प्रा़डॉ़ रेणू सिंग यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहायक प्रा़ राजेश लेहकपुरे यांनी मानले़ या कार्यशाळेत अध्यापकांना इंटरेक्टिव्ह स्मार्ट बोर्ड, पॉवरपार्इंट प्रस्तुती, स्पेलिंग ट्यूटर सॉफ्टवेअर, ग्राफिक्स सॉफ्टवेअर, फोटो सॉफ्टवेअर, डाटा स्टोरेज मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आदी अत्याधुनिक तंत्राबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे़ महात्मा गांधी हिंदी विद्यापीठाच्या संचार व मीडिया अध्ययन केंद्राद्वारे आयोजित केलेल्या या कार्याशाळेत प्राध्यापकांना नवीन ज्ञान मिळत आहे़(कार्यालय प्रतिनिधी)