महावितरणच्या शाखा अभियंत्यांवर आर्वीत हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 19:53 IST2019-05-11T19:53:22+5:302019-05-11T19:53:53+5:30
वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या शाखा अभियंत्यावर आर्वी येथे हल्ला करण्यात आला.

महावितरणच्या शाखा अभियंत्यांवर आर्वीत हल्ला
वर्धा : वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या शाखा अभियंत्यावर आर्वी येथे हल्ला करण्यात आला.
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आर्वी शाखा कार्यालयात कार्यरत शाखा अभियंता अंकुश काकडे यांना धाडी या गावात वीज चोरी होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी काकडे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन धाडी या गावात गेले. येथे तपासणी करीत असताना पटवा यांच्या घरी वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. काकडे कायद्यानुसार आपले काम करीत असताना मायासिंग पटवा आणि गुरनामसिंग पटवा यांनी काकडे यांच्यावर हल्ला करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.तसेच शिवीगाळ देखील करण्यात आली.
शाखा अभियंता काकडे यांनी या प्रकरणी आर्वी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार केली. आर्वी पोलिसांनी मायासिंग आणि गुरनामसिंग पटवा यांच्या विरोधात भा.द.वि कलम ३३२,३५३,५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.