एटीएम केंद्र झाले ‘कॅशलेस’
By Admin | Updated: November 17, 2016 00:54 IST2016-11-17T00:54:02+5:302016-11-17T00:54:02+5:30
५००, १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर प्रत्येक जण आहे त्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी धडपडत आहे.

एटीएम केंद्र झाले ‘कॅशलेस’
खातेदारांची दाणादाण : बँकांमधील व्यवहारांवरही मर्यादा
हिंगणघाट : ५००, १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर प्रत्येक जण आहे त्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी धडपडत आहे. बँका, एटीएम केंद्रांवर रांगा लागत आहेत. बँकांतून नोटा बदली करण्यात मर्यादा घालून दिल्या आहेत. यामुळे खातेदार एटीएमवरच अधिक भर देत असल्याचे दिसते. परिणामी, बहुतांश एटीएम केंद्र मात्र ‘कॅशलेस’ झाल्याने कुणालाच पैसे काढता येत नसल्याचे चित्र आहे.
शेतमाल विक्रीतून आलेले पैसे भरण्यासाठी शेतकरीही बँकेत व्यवहार करताहेत; पण काही बँकांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अडेल भूमिकेमुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. सामान्यांना पैसे कुठून आणल्याची विचारणा केली जात असल्याने शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त होत आहे. बऱ्याच ठिकाणी सहकार्याची भावनाही पाहायला मिळते. सध्या शहरात ग्राहकांची बँका तसेच एटीएमवर झुंबड होत आहे. कुणी पैसे काढण्यासाठी, कुणी नोटा बदलण्यासाठी तर कुणी पैसे जमा करण्यासाठी बँकेत रांगा लागलेल्या आहे. विशेष म्हणजे अनेक एटीएमवर बंदच्या पाट्या झळकत असून कॅशचा तुटवडा हेच प्रमुख कारण दिले जात आहे. श्रीराम टॉकीजच्या संकुलात असलेल्या कॅनरा बँकेच्या एटीएमचे गत चार दिवसांपासून शटरच उघडण्यात आले नाही. कॅश नसल्याचे कारण पूढे केले जात आहे.
सध्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन, कापूस विक्रीतून पैसे येत आहेत. अनेक व्यापारी रोखीने व्यवहार करतात. त्यामुळे १०००, ५०० नोटा शेतकऱ्यांकडे आहेत. ती रक्कम जमा करण्यासाठी शेतकरी बँकेत मोठ्या रांगेत लागतात. त्यांचा नंबर आल्यावर रक्कम लाखाच्या वर वा आसपास असल्यास बँक कर्मचाऱ्यांची प्रश्नांची सरबत्ती सुरू होते. पैसे कुठून आणल्याचा पुरावाही मागितला जातो. सातबारा व अन्य पुरावे मागितले गेल्याच्या घटनाही आहेत. या प्रकाराने शेतकऱ्यांत तिव्र नाराजी व्यक्त होत आहे. हिंगणघाट परिसरात सोयाबीन आणि कापसाचे खरेदी-विक्रीचे मोठे केंद्र असून अनेक ठिकाणचे शेतकरी येथे व्यवहार करतात, हे सर्वज्ञात आहे.
२ लाख ५० हजार रुपयांपर्यंत रकमेची चौकशी होणार नाही, असे निर्देश असताना सामान्य ग्राहकांना त्रास होत आहे. ही बाब संतापजनक असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पैशाची चणचण, नोटाबंदीचा मुद्दा सर्वत्र गाजत असून याच अवधीत पालिकेच्या निवडणूक आल्याने उमेदवार, नेत्यांना याचा फटका बसत असून आर्थिक चणचण जाणवत आहे. पैसा मिळविण्यासाठी अनेक उमेदवारांना स्वत: रांगेत उभे राहावे लागत आहे. अनेक उमेदवारांचे कार्यकर्ते एटीएमच्या रांगेत उभे केले जात असून यात बराच वेळ जात असल्याचे चित्रही समोर आले आहे.
१०००, ५०० च्या नोटा चलनातून बंद करण्याच्या निर्णयामुळे अनेकांना अडचण होत असून नवीन चलन दोन हजाराची नोट अद्याप पुरेशी चलन उपलब्ध होत नसल्याने वेळ लागत आहे. १०० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आता जाणवत आहे. उमेदवारांना विविध खर्चासाठी पैशाची गरज असून जुन्या १०००, ५०० च्या नोटा चालत नसल्याने सर्वांचीच अडचण वाढली आहे. धनादेशाचा पर्याय असला तरी बाजारात विश्वसनीय सध्या तरी ठरत नाही. कार्यकर्त्यांची दररोजची सोय, चहापाणी व इतर खर्च कसे भागवावे ही समस्या उमेदवारांना सतावत आहे. प्रचाराला वेग द्यायचा झाल्यास पदोपदी खर्च करावाच लागतो; पण पैशांची तजवीज करण्यातच अधिक वेळ जात असल्याने सर्वांची गोची झाली आहे.
५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या घोषणेने घराघरात असलेल्या लक्ष्मीने खर्चातून बचत करून वाचचिलेले पैसे आता घरातील मंडळींसमोर उघड करावे लागत आहे. त्यांनाही याचा मोठा भावनिक फटका बसला आहे. त्यांची गुप्त बचत उघड झाली असून त्या नोटा बदलण्यासाठी घरच्या कर्त्यांना कष्ट करावे लागत आहेत. जुन्या नोटा रद्द होणार, ही बातमी पोहोचताच महिलांची तारांबळ उडाली. महिलांनी आपल्या खर्चाला दिलेल्या पैशातून वाचवून ठेवलेल्या या नोटांचे काय होणार, या नोटा बदलून आणण्यासाठी कर्त्यांना द्यावेच लागेल. यातून ही रक्कम उघड झाली आणि ही किमया पंतप्रधानाच्या या घोषनेने झाली. घरातील पैसाही आता काळा राहणार नाही, हरी किमयाही घडली आहे.(शहर प्रतिनिधी)
नोटाबंदीचा लग्नकार्याला फटका
वायगाव (नि.) - नोटाबंदीच्या निर्णयामुळे घरात लग्नकार्य असलेल्या कुटुंबाची गोची झाली आहे. हातात जुन्या नोटा आहे; पण तो खर्च करता येत नसल्याने लग्नाची खरेदी कशी करावी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यामुळे लग्न घरातील संपूर्ण कुटुंब पैसे जमविताना धावपळ करताना दिसतात. आयुष्यातील विवाह बंधनासारख्या आनंदाच्या उत्सवात नोटांच्या तुटवड्याने अडचणींचा डोंगर उभा केल्याची भावना व्यक्त होत आहे. काही दिवसांत अक्षदा पडणाऱ्या विवाहेच्छुक वर, वधु आपल्या भावना व्यक्त करतात. तुळशी विवाहानंतर लग्न कार्यास सुरुवात झाली व लग्नकार्य असलेल्या घरांत आर्थिक नियोजनाची दशा झाल्याचे चित्र आहे. २-३ महिन्यांपासून लग्नाची तारीख काढल्यानंतर मुहूर्त जवळ असताना ५००, १००० च्या नोटा बंद झाल्याने खर्चांवर बंधने आली आहेत. बँकेत पैसा असताना तो मिळत नाही. हातात हजार, पाचशेच्या नोटा आहे; पण त्या स्वीकारल्या जात नसल्याने अडचणी वाढताना दिसत आहेत.(वार्ताहर)
सातव्या दिवशीही बँकांसमोर खातेदारांची तोबा गर्दी
कारंजा (घा.) - ५०० व १००० रुपयाच्या नोटा चलणातून बंद केल्यानतर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि नवीन नोटा काढण्यासाठी सातव्या दिवशीही बँकांसमोर तोबा गर्दी दिसून येत आहे. खातेदार नसलेले अनेक जण शेकडोच्या सख्येने बँकांसमोर रांगा लावत आहेत; पण तेच ते चेहरे दररोज दिसत असल्याने त्यांच्या व्यवहाराबद्दल शंका निर्माण होत आहे. काही श्रीमंत लोकांनी यांना रोजंदारी पद्धतीने पाठविले असल्याची जोरदार चर्चा आहे. नोटाबंदीचा तसेच नवीन कमी किमतीच्या नोटा पुरेशा उपलब्ध नसल्याने व्यवसायावर परिणाम होत आहे. शेतमजुरांना देण्यासाठी १०० वा ५० रुपयांच्या नोटा नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. काही खासगी डॉक्टर, दवाखान्यांत जुन्या नोटा स्वीकारत नाही. परिणामी, रुग्णांची हेळसांड होत आहे. गंभीर रुग्ण व नातलगांची अवस्था केविलवाणी आहे. लग्न, प्रवास खर्च कमी झाला तर व्यक्तिगत खर्चाला कात्री बसली आहे.(तालुका प्रतिनिधी)