आर्वी-देऊरवाडा मार्ग झाला अपघातप्रवण स्थळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:26 IST2018-10-22T23:25:50+5:302018-10-22T23:26:06+5:30
आर्वी-देऊरवाडा या मार्गाची दुर्दशा झाल्याने या मार्गावरुन वाहन चालविणे कठीण झाले आहे. मार्गावरील खड्डाराज पाहून हा मार्ग अपघातप्रवन स्थळ झाल्याची ओरड परिसरातील वाहनचालक करीत आहे.

आर्वी-देऊरवाडा मार्ग झाला अपघातप्रवण स्थळ
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : आर्वी-देऊरवाडा या मार्गाची दुर्दशा झाल्याने या मार्गावरुन वाहन चालविणे कठीण झाले आहे. मार्गावरील खड्डाराज पाहून हा मार्ग अपघातप्रवन स्थळ झाल्याची ओरड परिसरातील वाहनचालक करीत आहे.
आर्वी ते देऊरवाडा हा सहा किलो मीटरचा रस्ता असून हा अमरावती जिल्ह्याला जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यावरुन दिवसभर दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. आर्वी परिवहन विभागाच्या जवळपास ३२ फेऱ्या या रस्त्यावरून रोज धावतात. तसेच आर्वीला येणाºया तालुक्यातील १० ते १२ गावातील नागरिकांना याच रस्त्यावरून ये-जा करावी लागते. विशेष म्हणजे याच मार्गावर आर्वीचे शासकीय तंत्रनिकेतन, चार गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच रूख्मिणीचे प्रसिद्ध मंदिर कौंडण्यपूर येथे असल्याने कौडण्यपुरला जाण्यासाठी हाच मार्ग आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भक्त याच मार्गाने कौडण्यपुरला जातात. इतका महत्वाचा व वर्दळीचा असलेला हा रस्ता आता खड्ड्यात गेल्याने वाहनचालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. मागील महिन्याभरात अनेक अपघात या मार्गावर झाले असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग अद्यापही डोळे मिटून आहे. त्यामुळे अपघाचे प्रमाण लक्षात घेता तात्काळ या रस्त्याची दुुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
आर्वी-देऊरवाडा हा आर्वी तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा रस्ता असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने याची तातडीने दुरूस्ती संबंधित विभागाने करावी, अन्यथा या विरूद्ध तिव्र आंदोलन करण्यात येईल.
- दिलीप पोटफोडे
अध्यक्ष, आर्वी विधानसभा क्षेत्र युवा स्वाभिमान पक्ष