आर्वीचे कापूस खरेदी केंद्र सीसीआयच्या काळ्या यादीत
By Admin | Updated: February 12, 2015 01:33 IST2015-02-12T01:33:12+5:302015-02-12T01:33:12+5:30
कापसाचा हंगाम संपण्याच्या मार्गावर आला असताना शासनाने जाहीर केलेल्या ४ हजार ५० या हमीभावाने सीसीआयने जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू केली.

आर्वीचे कापूस खरेदी केंद्र सीसीआयच्या काळ्या यादीत
आर्वी : कापसाचा हंगाम संपण्याच्या मार्गावर आला असताना शासनाने जाहीर केलेल्या ४ हजार ५० या हमीभावाने सीसीआयने जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू केली. येथील कापूस खरेदी केंद्र मात्र सीसीआयने काळ्या यादीत टाकून व्यापाऱ्यांना खासगी कापूस खरेदीसाठी रान मोकळे करून दिल्याची माहिती आहे.
चार महिन्याच्या कालावधीत खासगी व्यापाऱ्यांनी आर्वीत अडीच लाख क्विंटल कापूस खरेदी करून सुमारे साडेसात कोटीची कमाई केल्याची माहिती आहे. सीसीआयनेही शेतकऱ्यांचा कापूस हमीभावात खरेदी करण्याचे नाकारून त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचे बोलले जात आहे. आर्वी शहर हे विदर्भात कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून इंग्रज काळापासून ओळख टिकवून आहे; पण यंदा नापिकी असताना सीसीआयने येथील शासकीय खरेदी केंद्र (यार्ड) काळ्या यादीत टाकले़ यामुळे शेतकऱ्यांना नाईलाज म्हणून खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. २७ आॅक्टोबरपासून खासगी कापूस खरेदी सुरू झाली. सध्या दररोज खासगीमध्ये सात ते साडेसात हजार क्विंटल कापसाची खरेदी ३८०० ते ३८५० या भावाने सुरू आहे. यात क्विंटल मागे ३०० रुपये कमी भाव दिला जात आहे़ यातही दीड टक्क्याने शेतकऱ्यांकडून बटाव कापला जातो. येथे खासगी कापूस खरेदी सुरू झाल्यापासून यार्डवर २ लाख ५० हजार क्विंटल कापसाची विक्री झाली़ यात ३०० रुपये कमी दर दिल्याने अडीच लाख कापसाची खरेदी करून साडेसात कोटींची कमाई व्यापाऱ्यांनी केली़ सिसीआयचे अधिकारी, व्यापाऱ्यांद्वारे शेतकऱ्यांची लूट झाल्याचे बोलले जात आहे़ आर्वी कृउबास अंतर्गत येणाऱ्या रोहणा उपबाजारात मात्र सीसीआयची कापूस खरेदी सुरू आहे, हे विशेष! आर्वीत कापसाची सर्वाधिक आवक असताना सीसीआयने शासकीय हमीभावाने कापूस खरेदी सुरू न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.(तालुका प्रतिनिधी)