आत्माच्या लेखापालास २५ हजाराची लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:31 IST2018-11-29T23:31:17+5:302018-11-29T23:31:48+5:30
प्रकल्प संचालक आत्मा आर्वी नाका वर्धा येथील कार्यालयात कार्यरत लेखापाल क्षितीज रवी जाधव (२९) याच्यासह आनंद श्यामलाल चिमनाणी या दोघांना २५ हजार रुपयांची रोख रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धाच्या पथकाने रंगेहात पकडले.

आत्माच्या लेखापालास २५ हजाराची लाच घेताना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रकल्प संचालक आत्मा आर्वी नाका वर्धा येथील कार्यालयात कार्यरत लेखापाल क्षितीज रवी जाधव (२९) याच्यासह आनंद श्यामलाल चिमनाणी या दोघांना २५ हजार रुपयांची रोख रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धाच्या पथकाने रंगेहात पकडले. या घटनेमुळे कृषी विभागाच्या कार्यालयातील भ्रष्टाचार उजेडात आला आहे.
उस्मानाबाद येथील मुळ रहिवासी असलेले क्षितीज रवी जाधव हे आत्मा प्रकल्प कार्यालयात लेखापाल पदावर कार्यरत होते. त्यांनी तक्रारकर्त्या इसमाला रेल्वे स्टेशन परिसरातील रुरल मॉल दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे ८० हजार रुपयांचे बील काढण्यासाठी धनादेश तयार करून देण्याच्या कामाकरिता ४० हजार रुपयाची मागणी केली होती, व ही रक्कम आनंद श्यामलाल चिमनानी (३५) रा. संत कंवरराम धर्मशाळा, रामनगर वर्धा यांच्यामार्फत स्विकारण्याची तयारी दाखविली होती. या प्रकरणी तक्रारकर्त्या इसमाने लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर गुरुवारी सापळा रचून २५ हजार रुपये रोख व १५ हजार रुपयांचे धनादेश स्विकारताना जाधव व चिमनाणी या दोघांनाही रंगेहात पकडले. आरोपीविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई नागपूर येथील पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक राजेंद्र दुधलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब गावडे, पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बावनेर, रोशन निंबोळकर, अतुल वैद्य, सागर भोसले, कैलास वालदे, विजय उपासे, हरिदास खडसे, दिलीप कुचनकर, अर्पण गिरजापुरे, स्मीता भगत, श्रीधर उईके यांनी पार पाडली.