महिलेचा ओढणीने गळा आवळून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 23:33 IST2018-05-02T23:33:17+5:302018-05-02T23:33:17+5:30
येथील पिपरी (मेघे) परिसरातील पिपल्स फॉर अॅनिमलच्या करूणाश्रमालगत असलेल्या टेकडी परिसरात बुधवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता तिचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले.

महिलेचा ओढणीने गळा आवळून खून
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील पिपरी (मेघे) परिसरातील पिपल्स फॉर अॅनिमलच्या करूणाश्रमालगत असलेल्या टेकडी परिसरात बुधवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता तिचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले. वेळीच तपासचक्र फिरल्याने तिची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. सदर महिलेचे नाव संध्या महादेव पाटील (५१) रा. गजानन नगर असे असल्याचे समोर आले असून हत्येचे कारण आणि आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
आज सकाळी पिपरी (मेघे) परिसरात असलेल्या टेकडीच्या परिसरात एका महिलेचा मृतदेह पडून असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. या माहितीवरून ठाणेदार विजय मगर आणि त्यांची चमू घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी यश येत नसलेल्या या प्रकरणात त्यांना मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले. घटनास्थळी पंचनामा करतानाच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रासायनिक तपासणी करणाऱ्या चमूला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पंचनामा करून सदर महिलेचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. येथून तिचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता सेवाग्राम रुग्णालयात नेण्यात आला.
संध्या पाटील ही आर्वी मार्गावर असलेल्या एका गॅस एजंसीत कार्यरत असल्याचे समोर आले. तिचा विवाह संजय तेलंग नामक व्यक्तीशी झाला होता. मात्र तिचा घटस्फोट झाल्याने ती पतीपासून विभक्त झाली होती. ती गजानन नगर येथे संध्या पाटील नावाने एकटीच राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. रामनगर पोलिसांचे हात आरोपींच्या मानेपर्यंत असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
घटनास्थळी ठाणेदार विजय मगर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक यादव, सुरज तेलगोटे, शिपाई आकाश चुंगडे यांच्यासह पिपरीचे सरंपच अजय गौळकार, उपसरपंच शेषराव मुंगले यांच्यासह परिसरात नागरिक जमा झाले होते. यातील एका इसमाकडूनच महिलेची ओळख पटली.
हत्येचे कारण गुलदस्त्यात
संध्या पाटील हिचा गळा आवळून खून झाल्याचे समोर आले आहे. मात्र तिची हत्या कोणत्या कारणातून झाली याचा खुलासा झाला नाही. या प्रकरणात एकापेक्षा अधिक आरोपी असल्याचा संशय पोलिसांचा आहे. सध्या या प्रकरणात कुठलाही सुगावा पोलिसांना लागला नसून हत्येचे कारण गुलदस्त्यात आहे. असे असले तरी सदर प्रकरण अनैतिक संबंधातून घडल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आधार केंद्र चालकांकडून असहकार्य
सदर महिलेची ओळख पटविण्याकरिता या भागातील आधार केंद्र चालकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडून पोलिसांना कुठलेही सहकार्य मिळाले नाही. यामुळे शासनाची ही प्रणाली वेळेवर कुचकामी ठरणारीच असल्याचे नागरिक बोलत होते.
स्थानिक महिलेच्या उपस्थितीत पंचनामा
पंचनामा करण्याकरिता घटनास्थळी महिला उपस्थित नसल्याने या परिसरातून एका महिलेला पाचारण करण्यात आले होते. या महिलेच्या उपस्थितीत येथे पंचनामा करण्यात आला.