अन्नपूर्णा माय घर धान्यानं भरू दे...
By Admin | Updated: October 14, 2014 23:23 IST2014-10-14T23:23:10+5:302014-10-14T23:23:10+5:30
आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला जिल्ह्यासह विदर्भात आठवीची पूजा केली जाते. कागदावर काढलेल्या हत्तीची या काळात येत असलेल्या फळांनी पूजा केली जाते. ज्वारीच्या कणसाचा मांडव

अन्नपूर्णा माय घर धान्यानं भरू दे...
पराग मगर - वर्धा
आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला जिल्ह्यासह विदर्भात आठवीची पूजा केली जाते. कागदावर काढलेल्या हत्तीची या काळात येत असलेल्या फळांनी पूजा केली जाते. ज्वारीच्या कणसाचा मांडव टाकला जातो. मातीच्या मडक्याचीही पूजा केली जाते. बाजारात सर्वत्र आठवीच्या पूजेचे साहित्य विकण्यास आले असून खरेदीची लगबग सुरू झाली आहे. निसर्गपूजक असलेल्या भारतीय समाजात आठवीची पूजा ही ढोवळमानाने धान्याची पूजा म्हणून केली जात असली तरी त्याचे सामाजिक व ऐतिहासिक संदर्भ काय याबाबत माहिती उपलब्ध नसल्याचे दिसते.
भारतीय समाज हा मुळात निसर्गपूजक आहे. त्या त्या काळात येत असलेल्या धान्याची पूजा करण्याची प्रथा सर्वत्र आढळते. आठवीची पूजा ही त्याचेच द्योतक आहे. आता जरी सर्वत्र गव्हाचे प्रचलन असले तरी पूर्वी जिल्ह्यात बहुतेक भागात ज्वारी मुख्य पीक होते. भाकरी हेच मुख्य खाद्य होते. त्यामुळे ज्वारीला अन्नपूर्णाही संबोधल्या जाते. याच काळात ज्वारीची कणसं भरतात. त्यामुळे ते पीक घरी आणताना तिची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली असावी. याच ज्वारीची आंबिल करून तिचा देवाला नैवेद्य देवाला अर्पण केला जातो. घर ज्वारीच्या भरल्या कणसाप्रमाणे भरून जावं यासाठी ही पूजा केली होत असे. पण कालांतराने या पूजेचे संदर्भ बदलले. गंगेच्या काठावर असलेल्या प्रांतामध्ये या दिवशी कुमारिका आपल्या ओंजळीत पाणी आणून देवीची पूजा करतात. त्यामुळे याला कराष्टमीही म्हणतात. त्याचप्रमाणे काही भागात या सणाला लेकुरवाळीची पूजा असेही म्हणतात. घरी या दिवशी कुळाचार असतो. आठ फळे ठेवून पूजा केल्यानेही याला काही भागात आठवीची पूजा म्हणतात. असे असले तरी या सणाचे ऐतिहासिक व सामाजिक संदर्भ काळाच्या ओघात धुसर झाले आहे. केवळ कुळाचार म्हणून पूजा केली जाते. खरीपातले पहिले धान्य असलेल्या ज्वारीच्या आंबिलीला विशेष मान होता. पण आता ज्वारीच पेरल्या जात नसल्याने प्रथा म्हणून दुकानातून ज्वारी आणून त्याची आंबिल केल्या जात असल्याचे दिसते.