११ दुचाकींसह २.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By Admin | Updated: August 1, 2015 02:32 IST2015-08-01T02:32:24+5:302015-08-01T02:32:24+5:30
जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्या विकणाऱ्या अट्टल दुचाकी चोरास हिंगणघाट पोलिसांनी अटक केली.

११ दुचाकींसह २.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट पोलिसांची कारवाई : वर्धेसह यवतमाळ, चंद्रपूर येथून चोरल्या दुचाकी
वर्धा : जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्या विकणाऱ्या अट्टल दुचाकी चोरास हिंगणघाट पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २ लाख ६५ हजार ६५५ रुपये किमतीच्या ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शुभम गोपाल काटकर (२०) रा. संत कबीर वॉर्ड, असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम काटकर हा शिवाजी मार्केट यार्ड परिसरात चोरीची दुचाकी फिरवित असल्याची माहिती मिळाली. यावरून हिंगणघाट ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी कारवाई करीत त्याला ताब्याता घेतले. त्याच्याजवळून प्रारंभी एम.एच.३२ एस.१६१० ही दुचाकी जप्त करण्यात आली. त्यास ताब्यात सखोल चौकशी केली असता सदर मोटरसायकलचा मुळ नोंदणी एम.एच.३२ एच.६१५५ असा असून सदरची मोटर सायकल त्याने आंबेडकर कॉलेज हिंगणघाट परिसरातून चोरल्याचे कबूल केले. त्याने हिंगणघाटसह आजनसरा, पवनार, मोठीवणी, राळेगाव जि.यवतमाळ, वरोरा, जि. चंद्रपूर अशा ठिकाणाहून मोटर सायकल चोरट्याचे कबुल केले. त्याच्याकडून हिंगणघाट शहरातील चार, आजनसरा येथून दोन, वरोरा येथील दोन, वणी, राळेगाव येथील प्रत्येकी एक या प्रमाणे एकूण १० मोटर सायकल किंमत २ लाख ६५ हजार ६५५ रुपयांचा माल हस्तगत केला आहे. त्याने पवनार येथून चोरलेली मोटरसायकल, दहेगाव जि. वर्धा येथे अवैधरित्या दारू वाहतुकीच्या गुन्ह्यात जप्त असल्याचे उघडकीस आले आहे.
आरोपी हिंगणघाट येथील सगुणा कंपनीत अस्थायी स्वरूपाचा कामगार असून तो गर्दीच्या ठिकाणावरील हॅन्डल लॉक नसलेल्या दुचाकी लंपास करीत होता.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, उपविभागीय वा.घ. सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक बोडखे, यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण पथकाचे निलेश मुंढे, निरंजन वरभे, सुधीर प्रांजळे व राजेंद्र हाडके यांनी केली. (प्रतिनिधी)