सोयाबीनमुळे शेतीच आली संकटात
By Admin | Updated: November 2, 2014 22:44 IST2014-11-02T22:44:41+5:302014-11-02T22:44:41+5:30
अतिवृष्टी व नापिकीमुळे सोयाबीन यंदा परवडत नसल्याचे दिसते़ सोयाबीनच्या अत्यल्प उताऱ्याने शेतकऱ्यांची शेतीच संकटात आल्याचे चित्र आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा आर्वी उपविभागातून

सोयाबीनमुळे शेतीच आली संकटात
आवक आली निम्म्यावर : पाच दिवसांत केवळ २ हजार ११७ पोत्यांची आवक
आर्वी : अतिवृष्टी व नापिकीमुळे सोयाबीन यंदा परवडत नसल्याचे दिसते़ सोयाबीनच्या अत्यल्प उताऱ्याने शेतकऱ्यांची शेतीच संकटात आल्याचे चित्र आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा आर्वी उपविभागातून होणारी सोयाबीनची आवक निम्म्यावर आली आहे. गत पाच दिवसांत आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ २ हजार ११७ पोत्यांची आवक झाली आहे़ मागील वर्षी हा आकडा १५ हजारांच्या वर होता.
तीन वर्षांपासून दुष्काळसदृश्य स्थिती असून नैसर्गिक प्रकोप वाढला आहे़ यातच प्रथम पावसाची दडी व नंतर अतिपाऊस यामुळे सोयाबीन व कपाशीची वाताहत झाली़ यावर्षी सोयाबीनची आराजी एकरी एक ते तीन पोते एवढी अत्यल्प आहे़ काहींना सोयाबीन पीक सवंगण्याची गरजच भासली नाही. ४ हजारांचे सोयाबीन काढण्यासाठी ६ हजारांचा खर्च, अशी स्थिती आहे़ यंदा आर्वी बाजार समितीची सोयाबीन खरेदी २७ नोव्हेंबरपासून सुरू झाली. शुभारंभ दिनी २६० पोत्यांची आवक झाली. दि़ २८ रोजी १७५, दि़ २९ ला ४२०, दि़ ३१ ला ५५६ तर १ नोव्हेंबरला ६०६ अशी पाच दिवसांत केवळ २ हजार ११७ पोत्यांची आवक झाली. मागील वर्षी ही आकडेवारी व आवक १५ ते १७ हजारांवर होती. यंदा ती निम्मीही झाली नसल्याने बाजार समितीत शुकशुकाट पसरला आहे़ यावर्षी सोयाबीनला उतारा नाही आणि भाव २६५० ते ३५०० एवढाच आहे. नापिकी व सततच्या पावसाने सोयाबीनची प्रतवारी खराब होऊन सोयाबीनचा दाणा बारिक झाला़ कमी-अधिक पाऊस झाल्याने शेतकरी सोयाबीन साठवूनही ठेऊ शकत नसल्याने शेतातून माल निघताच तो विकण्याशिवाय गत्यंतर नाही. अत्यंत कमी उतारा आणि अत्यल्प भाव, यामुळे शेतकऱ्यांचा झालेला खर्चही भरून निघत नसल्याचे दिसते़ अनेक शेतकरी सोयाबीन सवंगणारच नसल्याचेही दिसते़(तालुका प्रतिनिधी)