भालेवाडीत अग्नितांडव; पाच गोठ्यांचा कोळसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:01:52+5:30
गोठ्यातील शेतीपयोगी साहित्य, कुटार, बैलबंडी आणि स्पिंक्लरचे पाईप आगीत जळून राख झाले. या आगीमध्ये गोठ्यांपासून १०० मीटर अंतरावर असलेले निंबाचे झाडेही पूर्णत: जळाले. लगतच्या गुलाब बैगने व युवराज बैगने यांच्याही गोठ्याला झळ पोहोचली. आग लागल्याने गावात एकच गोंधळ उडाला.

भालेवाडीत अग्नितांडव; पाच गोठ्यांचा कोळसा
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : नजीकच्या भालेवाडी येथे गावालगत असलेल्या गोठ्यांना सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. गोठ्या जनावरांचे वैरण व लाकडी साहित्य असल्याने अल्पावधीतच रौद्र रुप धारण करुन पाच गोठ्यांच्या कोळसा केला. यात दीड वर्षाच्या एका वासराचाही होरपळून मृत्यू झाला.
तेजराव भाऊराव चौधरी यांच्या गोठ्यातील कुटार व शेतीपयोगी साहित्यासह बांधून असलेले वासरु हे जळाले. तसेच हेमराज चौधरी, वसंत चौधरी, चिरकुट चौधरी व भीमराव चौधरी यांच्या गोठ्यातील शेतीपयोगी साहित्य, कुटार, बैलबंडी आणि स्पिंक्लरचे पाईप आगीत जळून राख झाले. या आगीमध्ये गोठ्यांपासून १०० मीटर अंतरावर असलेले निंबाचे झाडेही पूर्णत: जळाले. लगतच्या गुलाब बैगने व युवराज बैगने यांच्याही गोठ्याला झळ पोहोचली. आग लागल्याने गावात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने गावाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी भरलेली असल्याने गावातील नळ सोडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण, आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून कारंजा येथील ओरएंटल टोल नाक्याचा टँकर बोलाविण्यात आला. तसेच आर्वी नगरपालिकेच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. आग आटोक्यात आल्यानंतर तब्बल तीनतास उशिराने आर्वीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. भालेवाडी या गावात जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांनी अजुनही कापूस विकलेला नाही. अनेकांच्या घरात कापूस भरुन आहे. गावालगतच असलेल्या गोठ्यांना आग लागल्यानंतर गावकऱ्यांची दाणादाण झाली पण, सुदैवाने मोठी हानी टळली. या आगीमध्ये शेतकºयांचे मोठे नुकसान झाले असून दुपारपर्यंत कोणत्याही अधिकाºयांनी भेट दिली नाही.
सिंदी (रेल्वे) - रविवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास येथील भोईपुरा परिसरातील नलू अरुण बावणे यांच्या घराला आग लागल्याने घरातील साहित्याची राखरांगोळी झाली. नलू बावणे यांचे भासरे भारत बावणे यांनी घरातील चूल पेटविली आणि साहित्याच्या खरेदीकरिता बाहेर निघून गेले. यादरम्यान घरामध्ये कुणीही नसताना चुलीतील विस्तवामुळे घराला आग लागली. यात घरातील साहित्यासह गहू, तांदूळ, तेल, कपडे, रेशनकार्ड यासह महत्त्वाचे कागदपत्र जळाले. यामध्ये त्यांचे वीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार नलू बावणे यांनी केली आहे. पुढील तपास येथील पोलीस करीत आहे.
बरबडीत गोठा जळल्याने एक लाखाचे नुकसान
समुद्रपूर : तालुक्यातील बरबडी येथील शेतकरी नानाजी चंदनखेडे यांचा कांढळी पुनर्वसन परिसरातील शेतात गोठा आहे. सोमवारी दुपारी या गोठ्यालगत असलेल्या रोहित्रामध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिंणगी उडाल्याने परिसरातील गवताने पेट घेतला. वाºयामुळे ती आग पसरत गोठ्यापर्यंत येवून गोठ्यालाही कवेत घेतले. यामध्ये गोठ्यातील सर्व साहित्य जळाल्याने शेतकºयाचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीची माहिती सिंदी (रेल्वे) येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दल येईपर्यंत लहू वैद्य, गोपाळ उरकुडे, अमर बोरकर, प्रमोद वांदिले, प्रतिक वांदिले, अंकुश वैद्य, सुनील कापसे, दिनेश गावंडे, प्रीतम गजुरडे, सुनील ठवरे, पोलीस उपनिरीक्षक गावंडे, लाईनमन समीर पिंपळशेंडे, गोपाळ वंगळ, पोलीस कर्मचारी चावरे आदींनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले पण, आग आटोक्यात आली नाही. अखेर अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविले. हंगामाच्या तोंडावरच शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी विद्युत विभागाकडे केली आहे.