शेतात पाणी गेल्यावर कळवा, नदीपात्राचे खोलीकरण करू
By Admin | Updated: May 8, 2015 01:54 IST2015-05-08T01:54:28+5:302015-05-08T01:54:28+5:30
नदी काठावर गाव असलेल्या ग्रामस्थांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जगावे लागते़ पुराचा धोका होऊ नये म्हणून ...

शेतात पाणी गेल्यावर कळवा, नदीपात्राचे खोलीकरण करू
झडशी : नदी काठावर गाव असलेल्या ग्रामस्थांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जगावे लागते़ पुराचा धोका होऊ नये म्हणून नदीपात्राच्या खोलीकरण व रूंदीकरणाची मागणी होत आहे; पण प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करताना दिसते़ सध्या उमरगाव येथील ग्रामस्थांना प्रकल्प प्रबंधकाच्या तुघलकी कारभाराचा फटका बसत असून नदी खोलीकरणाचे काम बंद करण्यात आले आहे़ यामुळे यंदाही पुराचा व शेतात पाणी शिरण्याचा धोका कायम राहणार असल्याचे दिसते़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़
काही वर्षांपासून झडशीच्या नदी काठावरील ग्रामस्थांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन रात्र काढावी लागत आहे़ पंचधारा नदीला पूर आला की नदीकाठच्या घरात पाणी शिरत होते़ शेत शिवारातील नाल्यांचा पाण्याचा प्रवाहही याच नदीला मिळून नदी काठावरील शेतात पाणी शिरून पिकाचे नुकसान होते होते; पण अद्याप नुकसान भरपाई देण्यात आली नाही़ उलट शेती पडीत ठेवावी लागत आहे़
दरवर्षी होणारे नुकसान टळावे, शेती करता यावी म्हणून शेतकऱ्यांनी नदीपात्र रूंदीकरण व खोलीकरण कामासाठी वैयक्तिक व सामूहिक परवानगी मागितली़ पाटबंधारे विभागाने विलंबाने का होईना परवानगी दिली़ यात सरपंचाचा पुढाकार महत्त्वाचा ठरला़ नागरिकांनी लोकवर्गणी गोळा केली़ यामुळे बजाज फाऊंडेशन संस्थेने नदीचे खोलीकरण व रूंदीकरण कामास गतवर्षी सुरूवात केली़ आतापर्यंत ९०० ते १००० मिटरचे काम झाले़ झडशी-सेलू मार्गावरील पुलाच्या समोरील मौजा उमरगाव परिसरातील काम शिल्लक राहिले आहे़ हे काम करण्यास प्रकल्प प्रबंधक नकार देत असल्याने ग्रामस्थांची गोची झाली आहे़ उमरगावचे शेतकरी बजाज फाऊंडेशनमार्फत काम करून घेण्यास दोन वर्षांपासून उत्सुक होते़ संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांची भेटही घेतली़ पाटबंधारे विभागाची मंजुरीही आणली़ शिवाय शेतकरी लोकवर्गणी देण्यास तयार आहे; पण प्रकल्प प्रबंधकाने समोरील काम पूर्ण न करता बंद पडले़ यामुळे शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे़(वार्ताहर)