आत्महत्येनंतर ‘त्या’ शेतकऱ्याचे कुटुंब होते दोन दिवस उपाशी
By Admin | Updated: October 9, 2015 02:35 IST2015-10-09T02:35:53+5:302015-10-09T02:35:53+5:30
मक्त्याने शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असलेल्या येथील गुणवंत नारायन झोटींग यांनी नापिकीमुळे गळफास लावून आत्महत्या केली.

आत्महत्येनंतर ‘त्या’ शेतकऱ्याचे कुटुंब होते दोन दिवस उपाशी
बेदखल : शिधापत्रिका नसल्याने धान्य पुरवठाही नाही
गौरव देशमुख वायगाव (निपाणी)
मक्त्याने शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असलेल्या येथील गुणवंत नारायन झोटींग यांनी नापिकीमुळे गळफास लावून आत्महत्या केली. घरचा आधार गेल्याने हतबल झालेल्या त्यांच्या कुटुंबाच्या पोटात अन्नाचा एक दानाही गेला नाही. पत्नी व दोन मुलांनी सतत दोन दिवस वरणाच्या पाण्यावर दिवस काढल्याचे विदारक वास्तव पुढे आले. या कुटुंबाच्या घराकडे कोणीही जावून पाहिले नाही.
प्रत्येक नागरिकाकडे शिधापत्रिका असावी, असा नियम आहे. मात्र वायगाव (निपाणी) येथील या कुटुंबाकडे शिधापत्रिका नसल्याने त्यांना धान्यही मिळू शकत नाही. यामुळे शासनाच्या योजनांपासूनही या कुटुंबाला वंचित राहण्याची वेळ आली आहे. या परिवाराला मदत करण्याची मागणी गावातून होत आहे. नावावर जमीन नसल्याने झोटींग यांच्या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळेल अथवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वायगाव (नि.) येथील गुणवंत झोटींग या ५० वर्षीय भूमिहीन कास्तकाराने ५ आॅक्टोबरला पहाटे ४ वाजता घरासमोरील कडू लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा पंचनामा करण्याकरिता पोलीस आले; मात्र त्यांच्या कुटुंबाला इतर कोणीही भेट दिली नाही. घरचा करता व्यक्ती जाताच या महिलेला आपल्या दोन मुलासह उपाशी दिवस काढावे लागले. कशीबशी रात्र दाळीचे पाणी पिऊन काढायची आणि दुसऱ्या दिवशी मुलांना घास भरविण्यासाठी काही तजविज होऊ शकते काय, या विवंचनेत ही माऊली सध्या आहे. हे भुकेचे तांडव सतत दोन दिवस त्या कुटुंबात नांदत होते.
अठराविश्वे दारिद्रयावर मात करीत कुटूंब प्रमुख म्हणून आता अरुणा गुणवंत झोटींग हिने जबाबदारी स्वीकारली.
तिच्या सोबत मुलगी पुनम व मुलगा अमर आहे. यातील पुनम व अमर यांचे शिक्षण पूर्ण करायचे आहे. सपनाचे लग्न २०१२ मध्ये झाले तर पुनम ही बी.ए. ला आहे. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने अमर याने शिक्षण सोडून चहा टपरीवर काम सुरू केले आहे. या माऊलीवर आता दुसऱ्यांकडे पदर पसरवण्याची वेळ आली.
जीवन झाले गहाण
आत्महत्या केलेला गुणवंत झोटींग गत तीन वर्षांपासून आठ एकर कोरडवाहू शेती मक्त्याने करीत होता. सोयाबीन आणि कपाशी ही प्रमुख पिके घेत होता. जोड म्हणून मोठ्या शेतकऱ्याच्या शेतात सालकरी म्हणून कामही सुरू होते. अमर १५ वर्षांचा असून त्याने वडिलाला हातभार लावण्यासाठी चहा टपरीवर काम सुरू केले. यावर त्याच्या कुटूंबाचा गाढा होता. गत दोन वर्षांत कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे तोंडी आलेला घास हिरवला. आता सततच्या नापिकीमुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला.
या वर्षीही वातावरणाने कहरच केला. अल्पप्रमाणात पाऊस व वातावरणात अचानक बदल होत जात असल्याने पिकावर आलेली रोगराई, अळ्यांचा हल्ला यामुळे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर पाहून गुणवंताची मनस्थिती खालावली. आणि त्याने आत्महत्येचा मार्ग निवडला.