पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या
By Admin | Updated: July 7, 2014 00:04 IST2014-07-07T00:04:10+5:302014-07-07T00:04:10+5:30
गाढव वाहन असलेले पुनर्वसू नक्षत्र ६ जुलैपासून सुरू झाले, तरीसुद्धा खरीप हंगामाला सुरुवात झाली नाही. यामुळे बळीराजा विवंचनेत आहे. सोयाबीनच्या पेरण्या अद्याप न झाल्याने शेतकऱ्यांना खरीप

पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या
घोराड : गाढव वाहन असलेले पुनर्वसू नक्षत्र ६ जुलैपासून सुरू झाले, तरीसुद्धा खरीप हंगामाला सुरुवात झाली नाही. यामुळे बळीराजा विवंचनेत आहे. सोयाबीनच्या पेरण्या अद्याप न झाल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांची काळजी आहे.
रोहिणी किंवा मृग नक्षत्रात कपाशी, तूर, ज्वारी, सोयाबीन या पिकाची शेतात रोवणी करण्यात येते. मात्र रोहिणी, मृग, अन त्या पाठोपाठ आलेल्या आर्द्रा नक्षत्रातही पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे पिकांच्या पेरणीला जवळपास एक ते दीड महिना विलंब झाला आहे. अजूनही उन्हाळा तापत आहे. शेतातील जमीन गरम होत आहे. यामुळे बियाण्यातील अंकुराला याच्या झळा बसतात. परिणामी बीज उगविण्याच्या पूर्वीच उन्हामुळे करपण्याची स्थिती आहे. आकाशात तयार होणारे ढगाळ वातावरण कधी कधी आशेचा किरण देत असले तरी शेतकऱ्यांची निराशा होत आहे. गत काही दिवसाअगोदर आलेल्या पावसाने आस लावली अन मोजक्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला सुरुवात केली. पण दुपारीच पडलेल्या कडक उन्हामुळे पेरणी बंद केली. सेलू तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र अधिक आहे. अजूनही काळया मातीत तिफण चाललीच नाही. या नक्षत्रात हिरवा शालू परिधान करणारी शेत माऊली पावसाची प्रतीक्षा करीत आहे. महागडे सोयाबीनचे बियाणे शेतकऱ्यांच्या नजरेपुढे घरी पडून आहे. खर्चात उतरलेला शेतकरी कपाशीची झालेली मोड उगवलेले अंकूर मरणासन्न होतांना पाहून डोळयात अश्रु दाटून येत आहे. पावसाळ्यासाठी उन्हाळाच तापत असेल तर कालचक्र तर बदलले नसावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. स्प्रिंकलरवर पेरा करावा तर विहिरीच्या पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे खरीप हंगाम चांगला राहील ही भाबडी आशा आता फोल ठरली आहे.(वार्ताहर)