Adventure; Two trucks, one tractor seized | धाडसत्र; दोन ट्रक,एक ट्रॅक्टर जप्त
धाडसत्र; दोन ट्रक,एक ट्रॅक्टर जप्त

ठळक मुद्देअवैध वाळूउपसा : हिवरा (कावरे) व गुंजखेडा घाटात देवळी तहसीलदारांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाळूघाटातूनवाळू उपस्याची मुदत संपली असतानाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळू उपसा सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेनुसार देवळी तालुक्यात तहसीलदारांच्या पथकाने धाडसत्र राबवून हिवरा (कावरे) येथील घाटातून दोन ट्रक तर गुंजखेडा घाटातून एक ट्रॅक्टर जप्त केला. ही कारवाई शनिवारी रात्री व रविवारी सकाळी करण्यात आली आहे. त्यामुळे वाळू चोरट्यांचे धाबे दणाणले आहे.
हिवरा(कावरे) येथील वाळूघाटाचा दुसऱ्या टप्प्यात लिलाव झाला होता. त्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली तर गुंजखेडा या घाटाचा यावर्षी लिलावच झालेला नव्हता. तरिही हिवरा (कावरे) वाळूघाटातून रात्रीच्या सुमारास अवैधरीत्या वाळू उपसा सुरू होता. त्यामुळे तहसीलदार राजेश सरवदे, घनश्याम कावळे व उईके यांनी शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास वाळूघाटावर जाऊन पाहणी केली असता त्यांना दोन ट्रक आढळून आले. त्यांनी शुुभम ढोक रा. सालोड (हिरापूर) याच्या मालकीचा एम.एच.३१ सीक्यू ९९९८ तर अजिम शेख रा. वर्धा यांच्या मालकीचा एम.एच. ३१ सीक्यू ५८१९ क्रमांकाचा ट्रक जप्त केला. ही दोन्ही वाहने देवळी तहसील कार्यालयात उभी करण्यात आली आहे. यासोबतच गुंजखेडा घाटात बोटीच्या माध्यमातून वाळूउपसा सुरू असल्याची माहिती मिळताच पुलगाव पोलीस आणि देवळीच्या तहसील कार्यालयाने रविवारी सकाळी दहा वाजता संयुक्तरीत्या कारवाई करीत एक ट्रॅक्टर व दहा ब्रास वाळूचा ठिय्या जप्त केला आहे. जप्त केलेला ठिय्या व ट्रॅक्टर अकील खान सईद खान पठाण रा. वल्लभनगर पुलगाव याचा मालकीचा असून ट्रक्टरचा क्रमांक एम.एच. ३२ एफ १७६५ असल्याचे सांगण्यात आले. कारवाईची माहिती मिळताच या घाटातील बोट अमरावतीच्या हद्दीत नेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जप्त केलेला टॅÑक्टर पुलगाव पोलीस ठाण्यात उभा करण्यात आला आहे. या कारवाईत देवळीचे तहसीलदार राजेंद्र सरवदे, नायब तहसीलदार राजेंद्र देशमुख, तलाठी बन्सोड, तलाठी बुरांडे व पोलीस कर्मचारी रवींद्र भुजबळे, मुकेश वांदिले आदींचा समावेश होता.

तालुक्यातील वाळूसाठ्यावर कारवाई कधी?
देवळी तालुक्यात सध्या वाळूचोरट्यांनी चांगलाच धुडगूस घातला आहे. मोठ्या प्रमाणात उपसा करून विनापरवानगी जागोजागी वाळूचा ठिय्या मांडला आहे. विजयगोपाल, सावंगी (येंडे), हिरापूर (तळणी), हिवरा (कावरे), इंझाळा या परिसरात शेकडो ब्रास वाळूचा ठिय्या आहेत. त्यामुळे या ठिय्यावर कारवाई करणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने तालुक्यातील नदी-नाल्यातून रात्रीच्या अंधारात वाळू उपसा सुरू आहे. तालुक्यात सारेच आलबेल असल्याने वाळूचोरट्यांना कारवाईची भीतीच राहिली नाही. त्यामुळे सोनेगाव (बाई) येथील कारवाईनंतरही वर्धा आणि सालोड येथील वाळू चोरट्यांचा उपद्रव सुरु आहे.
देवळी तालुक्यात सुरु असलेल्या या वाळू चोरीची माहिती वर्ध्यातील जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना मिळते; मात्र, तहसील प्रशासनाला मिळत नाही. याचे आश्चर्यच आहे. काही दिवसांपूर्वी सोनेगाव (बाई) येथे झालेली कारवाई तसेच आत्ताची कारवाई ही वरिष्ठांच्या सूचनेवरुन झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

असा आकारला जातोय दंड
अवैध वाळू उत्खनन करताना ट्रक्टर किंंवा हाफ बॉडी ट्रक आढळून आल्यास १ लाख रुपये, फुल बॉडी ट्रक आढळ्यास २ लाख रुपये याव्यतिरिक्त वाळूसाठा असल्यास बाजार मुल्याच्या पाचपट रक्कम असा एकूण दंड आकारल्या जातो. जेसीबी किंवा पोकलॅड आढळल्यास ७ लाख ५० हजार रुपये आणि बोटीला ५ लाखाचा दंड दिल्या जातो. त्यामुळे देवळी तहसीलदारांनी केलेल्या कारवाईतील वाहनांनाही या प्रमाणेच दंड आकारण्यात येणार आहे.

बोट जमा करा; अन्यथा गुन्हा दाखल करणार
गुंजखेडा वाळूघाटातून अवैधरित्या बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा सुरु होता. त्यामुळे महसूल विभाग व पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करीत ट्रॅक्टर व दहा ब्रास वाळू साठा जप्त केला. अधिकारी घाटात पोहोचत असल्याची माहिती मिळताच घाटातील बोट अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत नेण्यात आली. त्यामुळे ४८ तासात ती बोट महसूल विभागाच्या ताब्यात द्यावी, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल. अशा सूचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे आता पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील हिवरा (कावरे) व गुंजखेडा या दोन्ही घाटावर कारवाई करीत दोन ट्रक, एक ट्रॅक्टरसह १० ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला आहे. गुंजखेडा घाटातून बोट पळविल्याने ती जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कारवाईचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला असून त्यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई केली जाईल.
राजेंद्र सरवदे, तहसीलदार, देवळी

Web Title: Adventure; Two trucks, one tractor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.