पाच पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता
By Admin | Updated: November 29, 2014 23:24 IST2014-11-29T23:24:29+5:302014-11-29T23:24:29+5:30
जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या शनिवारी पार पडलेल्या बैठकीत सुसुंद्रा, सारवाडी, सावळी (बु.), आजनसरा व कोरा-साखरी येथील पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली.

पाच पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता
वर्धा : जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या शनिवारी पार पडलेल्या बैठकीत सुसुंद्रा, सारवाडी, सावळी (बु.), आजनसरा व कोरा-साखरी येथील पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. तसेच विंधन विहिरींसाठी हातपंप संच, ३२ मि.मी. व्यासाचे जी.आय. पाईप्स व सुटे भाग खरेदीसाठीच्या शिफारशीचा ठरावही मंजूर करण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
समितीला असलेल्या अधिकारान्वये कारंजा तालुक्यातील सर्वाधिक तीन गावातील पाणी पुरवठा योजनेला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये सुसुंद्रा (किंमत ६२,९७, ५०० रुपये), सारवाडी (१,२४,९६,६३६ रुपये) व सावळी (बु.) (५१,८६,१२७ रुपये) या गावांसह हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा (१,४७,३९०० रुपये) व समुद्रपूर तालुक्यातील कोरा व साखरा येथे १ कोटी १३ लाख १२ हजार ४०६ रुपयांच्या संयुक्त पाणी पुरवठा योजनेला चर्चेअंती समितीने मान्यता प्रदान केली.
या बैठकीत पाणी पुरवठा कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये २०१३-१४ मध्ये ५८ पैकी पाच साध्य झाले असून उपलब्ध ८ कोटी ७२ लाख ३९ हजार रुपयांपैकी ५ कोटी ५० लाख २४ हजार रुपयांचा निधी खर्च झाल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. याबाबत उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी ५८ गावांची निवड कोणत्या निकषाद्वारे करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष चित्रा रणनवरे होत्या. बैठकीला उपाध्यक्ष विलास कांबळे, सभापती श्यामलता अग्रवाल, मिलिंद भेंडे, वसंता पाचोडे, चेतना मानमोडे व सदस्य गोपाल कालोकर, निर्मला बिजवे, वैशाली गोमासे, मंदा चौधरी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)