बनावट दारू तयार करणारे सक्रिय
By Admin | Updated: July 23, 2014 23:45 IST2014-07-23T23:45:09+5:302014-07-23T23:45:09+5:30
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या तालुक्यात प्रवाशांकडून नेहमीच दारूची विचारणा होते़ दारूबंदी असलेल्या जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या कारंजा येथे त्यांना दारू मिळते;

बनावट दारू तयार करणारे सक्रिय
कांरजा (घाडगे) : राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या तालुक्यात प्रवाशांकडून नेहमीच दारूची विचारणा होते़ दारूबंदी असलेल्या जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या कारंजा येथे त्यांना दारू मिळते; पण ती बनावट असल्याचे अनेकदा समोर आले आहे. कधीकाही बनावट दारू तयार करण्याचा अड्डा असलेल्या या तालुक्यात पोलिसांच्या दुर्लक्षामुळे पुन्हा बनावट दारू तयार करून विकणारे सक्रीय झाले आहे़
कारंजा शहरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात देशी, विदेशी, मोहाची दारू मोठ्या प्रमाणात विकली जाते़ आता तर अधिकचा नफा कमविण्याच्या नादात दारूविक्रेते नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे दिसते़ २०१२ या वर्षाची तारीख असलेल्या बाटलीत बनावट दारू पॅकिंग करून ती विकली जात आहे. कारंजा शहरातील बनावट दारू तयार करण्याच्या कारखान्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यांनतर याकडे कुणीच फिरकले नाही. नेमका याचाच फायदा घेत बनावट दारू तयार करणाऱ्यांचे रॅकेट पुन्हा सक्रिय झाले आहे. यात विदेशी दारूच्या बाटलीत गावठी दारू असल्याचे अनेकदा निष्पन्न झाले़ सोबतच पाण्याच्या पाऊचप्रमाणे पन्नीच्या पॅकिंगमध्येही ती विकली जात आहे. ठाणेदार विनोद चौधरी यांनी दारू विक्रेत्यांना चांगलेच वठणीवर आणले असले तरी त्यांच्यापुढे बनावट दारूविक्री, हे आवाहनच आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे़(शहर प्रतिनिधी)