दोन महिन्यांपासून फरार आरोपीला अटक
By Admin | Updated: July 23, 2015 02:09 IST2015-07-23T02:09:42+5:302015-07-23T02:09:42+5:30
वृक्षतोड करण्यास बनावट कागदपत्र तयार करण्याच्या प्रकरातील आरोपी धनराज अवजेकर रा. पिंपळखुटा याला खरांगणा पोलिसांनी सोमवारी पिंपळखुटा येथेच अटक केली.

दोन महिन्यांपासून फरार आरोपीला अटक
खरांगणा (मो.) : वृक्षतोड करण्यास बनावट कागदपत्र तयार करण्याच्या प्रकरातील आरोपी धनराज अवजेकर रा. पिंपळखुटा याला खरांगणा पोलिसांनी सोमवारी पिंपळखुटा येथेच अटक केली. सदर आरोपी गत दोन महिन्यांपासून फरार होता. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
खरांगणा वनपरिक्षेत्रातील मौजा सुसुंद येथील सर्व्हे क्रमांक २२ मधील सागवान झाडे मासोद येथील शेख हफीज शेख नबी याने विकत घेतली होती. ही झाडे नंतर शेख हफीज याने नागपूरचे लाकूड व्यापारी विरेंद्र सुरानी यांच्यासोबत लाकूड विक्रीचा व्यवहार करण्याचे नियोजन केले होते. या सागवान झाडांच्या तोडीकरिता परवान्याची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे लक्षात आले. यावरून वन विभागाच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात धनराज अवजेकर, शेख हफीज शेख नबी आणि विरेंद्र सुराणा यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला होता.
यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली होती; पण धनराज अवजेकर हा फरार झाला होता. लाकूड तोडीची बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी धनराजनेच मदत केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. यामुळे पोलिसांद्वारे आरोपीचा शोध घेतला जात होता; पण तो हाती लागला नाही. अखेर अवजेकर सोमवारी पिंपळखुटा येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पिंपळखुटा गाठत त्यास अटक करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रशांत पांडे, सहायक उपनिरीक्षक वसंत इंगोले करीत आहेत.(वार्ताहर)