नातेवाईकांचा आरोप; डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:00 IST2019-09-23T06:00:00+5:302019-09-23T06:00:42+5:30
संदेशचा मृत्यू डॉ. कोहळे यांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळेच झाल्याचा आरोप करीत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी रविवारी नातेवाईकांनी मृतदेहासह पोलीस ठाण्यात दोन तास ठिय्या मांडला. पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी नातेवाईकांची समजूत काढत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

नातेवाईकांचा आरोप; डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : नजिकच्या गणेशपूर (बोरगाव) येथील युवकाचा शनिवारी सायंकाळी सावंगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. परंतु या रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच गावातील डॉक्टरने चुकीचा उपचार केल्याचा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या देऊन डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संदेश बन्सीलाल मोहिते (१९) रा. गणेशपूर (बोरगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. बुधवारी त्याला थंडी वाजून ताप आल्याने उपचाराकरिता सिंदी (रेल्वे) येथील डॉ. पुरुषोत्तम कोहळे यांच्या दवाखान्यात आणले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करीत त्याला इंजेक्शन व गोळा दिल्या. दोन दिवसानंतर इंजेक्शनची जागा दुखत असल्याने तो शुक्रवारी पुन्हा डॉक्टरकडे गेला आणि उपचार करुन गावाकडे परतला. मात्र, प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने त्याच दिवशी रात्री १० वाजता पुन्हा डॉक्टरकडे आला. दवाखाना बंद असल्याने तो दुसऱ्या डाँक्टरकडे गेला. डॉ. पालिवाल यांनी कोणताही उपचार न करताा त्याला ताबडतोब सेवाग्रामला दाखल करण्याचा सल्ला दिला. लगेच नातेवाईकांनी त्याला रात्री ११ वाजता सेवाग्रामला दाखल केले. तेथे उपचार सुरु केल्यानंतर त्याला इंजेक्शनचे इंन्फेक्शन झाल्याचे सांगून आमच्याकडे तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यास सांगितले.
त्यामुळे संदेशला सावंगी रुग्णालयात हलविले. तेथे उपचाराला प्रतिसाद न देताच शनिवारी सायंकाळी त्याची प्राणज्योत मावळली. संदेशचा मृत्यू डॉ. कोहळे यांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळेच झाल्याचा आरोप करीत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी रविवारी नातेवाईकांनी मृतदेहासह पोलीस ठाण्यात दोन तास ठिय्या मांडला. पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी नातेवाईकांची समजूत काढत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
त्यामुळे नातेवाईकांनी मृतदेह उचलून अंत्यसंस्कारासाठी रवाना झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक वंदना सोनुने अधिक तपास करीत आहे.
त्या युवकावर मी माझ्या दवाखान्यात आल्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांनी कुठे उपचार घेतला त्याची मला कल्पना नाही. त्याचा मृत्यू स्क्रब टायफस किंवा मेंदुज्वरामुळे सुद्धा होऊ शकतो.
डॉ.पुरूषोत्तम कोहळे, डॉक्टर, सिंदी (मेघे)