‘अपघात’ विमा योजनेने केला आठ शेतकऱ्यांचा ‘घात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 10:30 IST2021-03-04T05:00:00+5:302021-03-04T10:30:17+5:30
प्रस्ताव जिल्हास्तरीय कृषी कार्यालयातून शासनाने नेमून दिलेल्या विमा सल्लागार कंपनीकडे जातो. या ठिकाणी प्रस्तावाची छाननी होऊन पुढे तो विमा कंपनीकडे वळता केला जातो. परिपूर्ण कागदपत्रे असतील तर विमा कंपनी मृताच्या वारसदाराच्या बँक खात्यात दोन लाखांची रक्कम वळती करते. असे असले तरी आतापर्यंत ७६ पैकी केवळ २४ प्रकरणे योजनेच्या लाभासाठी पात्र ठरवून मृतांच्या वारसाच्या बँक खात्यात रक्कम वळती करण्यात आली आहे.

‘अपघात’ विमा योजनेने केला आठ शेतकऱ्यांचा ‘घात’
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एखाद्या शेतकऱ्याचे तसेच शेतकरी कुटुंबातील व्यक्तीचे अपघाती निधन झाल्यास राज्य शासन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपयांची भरपाई देते. ही योजना लागू झाल्यापासून जिल्ह्यात या योजनेच्या लाभासाठी एकूण ७६ प्रकरणे आली. पण त्यापैकी आठ प्रकरणे विमा कंपनीने अपात्र ठरविल्याने शेतकरी ‘अपघात’ विमा योजनेनेच त्या आठ कुटुंबाचा ‘घात’ केल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्याला आपले आवेदन आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावा लागते. त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हास्तरीय कृषी कार्यालयातून शासनाने नेमून दिलेल्या विमा सल्लागार कंपनीकडे जातो. या ठिकाणी प्रस्तावाची छाननी होऊन पुढे तो विमा कंपनीकडे वळता केला जातो. परिपूर्ण कागदपत्रे असतील तर विमा कंपनी मृताच्या वारसदाराच्या बँक खात्यात दोन लाखांची रक्कम वळती करते. असे असले तरी आतापर्यंत ७६ पैकी केवळ २४ प्रकरणे योजनेच्या लाभासाठी पात्र ठरवून मृतांच्या वारसाच्या बँक खात्यात रक्कम वळती करण्यात आली आहे.
मृतांच्या वारसदाराला किती मिळते रक्कम
आवश्यक कागदपत्रांसह सादर करण्यात आलेले प्रकरण पात्र ठरल्यावर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होत मृताच्या वारसदाराच्या बँक खात्यात विमा कंपनी दोन लाखांची रक्कम वळती करीत असल्याचे सांगण्यात आले.
या वारसदारांचा प्रस्ताव केला नामंजूर
आर्वी तालुक्यातील उमरी येथील मंदा धर्मराज धुर्वे, हिंगणघाट तालुक्यातील मनसावळी येथील पुष्पा बाबाराव भुसारी, कारंजा तालुक्यातील लिंगा येथील लता शिवाजी धोंगडे, वर्धा तालुक्यातील प्रमिला शंकर भुरे, हिंगणघाट तालुक्यातील शेलापूर येथील सुधा विलास राऊत, देवळी तालुक्यातील हरलेपूर येथील सुधोदन ज्ञानेश्वर सोमकुवर, देवळी तालुक्यातील लोणी येथील माया गौतम फुलझेले तर आर्वी तालुक्यातील दिघी पानवाडी येथील भारत सदाशीव ठाकरे या वारसदाराचा प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केला आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभासाठी एकूण ७६ प्रस्ताव प्राप्त झालेत. त्यापैकी २४ प्रस्ताव पात्र ठरवून मृतांच्या वारसाला नियमानुसार रक्कम देण्यात आली आहे. तर १५ प्रकरणे त्रुटींमुळे प्रलंबित असून २९ प्रकरणे प्रक्रियेत आहेत. आतापर्यंत आठ प्रकरणे योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरविण्यात आली आहेत.
- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.