आदेश झुगारून अतिक्रमणाला अभय
By Admin | Updated: April 9, 2015 02:55 IST2015-04-09T02:55:55+5:302015-04-09T02:55:55+5:30
नालवाडी येथील एलआयसी कॉलनी वॉर्ड क्ऱ ५ मधील शासकीय जागेवर अतिक्रमण करून झोपडी बांधण्यात आली आहे़...

आदेश झुगारून अतिक्रमणाला अभय
वर्धा : नालवाडी येथील एलआयसी कॉलनी वॉर्ड क्ऱ ५ मधील शासकीय जागेवर अतिक्रमण करून झोपडी बांधण्यात आली आहे़ शिवाय संबंधित व्यक्ती मद्याच्या नशेत महिलांना शिवीगाळ करतो़ याबाबत तक्रारी केल्यानंतर जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले; पण नालवाडी ग्रामपंचायत आदेशालाही जुमानत नसल्याचे दिसते़
नालवाडी परिसरात मुरलीधर पलटनकर यांनी अतिक्रमण करून झोपडी बांधली़ याबाबत जिल्हाधिकारी व जि़प़ मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निवेदन दिले़ यावर सदर झोपडी अवैध बांधकाम असल्याचा निर्वाळा जि़प़ मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी दिला़ विस्तार अधिकाऱ्यांनीही ते शासकीय जागेवरील अतिक्रमण असल्याचा अहवाल दिला़ गटविकास अधिकाऱ्यांनी नालवाडी ग्रा़पं़ ला झोपडी हटविण्याचे निर्देश दिले़ ग्रा़पं़ ने १३ डिसेंबर २०१३ ते २९ जानेवारी २०१४ या कालावधीत तीन नोटीस देत झोपडी उचलण्याची ताकीद दिली; पण झोपडी अद्याप उभी आहे. अवैध झोपडीधारक, पलटनकर हा नालवाडी येथील रहिवाशी नसताना तेथे आला कसा, अवैध झोपडी कशी उभारली, हे एक कोडे आहे. नालवाडी मतदार यादीत तर त्याचे नावही नाही.
हा व्यक्ती रात्री-बेरात्री मद्यधुंद अवस्थेत महिलांना शिवीगाळ करतो. याबाबत त्रस्त महिलांनी पोलीस अधीक्षक व शहर पोलिसांना तक्रार केली़ अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़(कार्यालय प्रतिनिधी)