बिचारा बिबट्या... शिकारीच्या मोहात रोहित्रावर चढला अन् जीव गमावून बसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2022 17:53 IST2022-05-05T17:47:05+5:302022-05-05T17:53:10+5:30
आज सकाळच्या सुमारास पाणी पुरवठा करणाऱ्या रोहित्रावर हा बिबट मृतावस्थेत आढळून आला.

बिचारा बिबट्या... शिकारीच्या मोहात रोहित्रावर चढला अन् जीव गमावून बसला
सेलू (वर्धा) : शिकारीच्या लोभात थेट रोहित्रावर चढणे एका बिबट्याच्या जीवावर बेतले. ही घटना आज (दि. ५) तालुक्यातील जयपूर येथे उघडकीस आली असून विजेचा करंट लागून बिबट्याचामृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जयपूर येथील बोर नदीच्या काठी वसलेल्या वन विभागाच्या झुडूपी जंगलाच्या प्लॅन्टेशन परिसरात नागरिकांना कालपासून उग्र वास येत होता. दरम्यान स्थानिक नागरिकांनी याचा शोध घेतला असता त्यांना आज सकाळच्या सुमारास पाणी पुरवठा करणाऱ्या रोहित्रावर बिबट मृतावस्थेत आढळला. लागलीच यासंदर्भात वनविभागाला माहिती देण्यात आली. सदर बिबट हा माकडासारख्या शिकारीच्या मागे लागून रोहित्रावर चढला असावा व त्याचा करंट लागल्याने मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तविण्यात आला.
यावेळी घटनास्थळी वनविभागासह महावितरण तसेच पोलीस प्रशासनाने भेट दिली. यासोबतच स्थानिक नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शवविच्छेदनानंतर मृतक बिबट्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.