९४.९८ टक्के गोवंशांना दिली ‘गोट फॉक्स’ लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 05:00 IST2020-09-27T05:00:00+5:302020-09-27T05:00:23+5:30
जिल्ह्यात कोरोना थैमान घालत असताना गाय वर्गीय जनावरांवर ‘लम्पी स्कीन डिसीज’ हा विषाणू संसर्गाचे संकट ओढावल्याने आठही तालुक्यातील पशुपालकांच्या अडचणीत भर पडली. ही बाब पशुसंवर्धन विभागाच्या लक्षात येताच जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचे निश्चित केले. त्यानंतर तीन लाखांच्या निधीतून लम्पी स्कीन डिसीजला अटकाव घालण्यासाठी उपयुक्त ठरणारी गोट फॉक्स लसीची खरेदी करून लसीकरणास सुरूवात केली.

९४.९८ टक्के गोवंशांना दिली ‘गोट फॉक्स’ लस
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लंम्पी स्कीन डिसीजला हद्दपार करण्याचा विडा उचलणाऱ्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाने आतापर्यंत जिल्ह्यातील ९४.९८ टक्के गोवंशांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उपयुक्त ठरणारी ‘गोट फॉक्स’ ही लस दिली आहे. इतकेच नव्हे तर योग्य पद्धतीने औषधोपचार करून १० हजार ८५६ गाय वर्गीय जनावरांना बरे केले आहेत.
जिल्ह्यात कोरोना थैमान घालत असताना गाय वर्गीय जनावरांवर ‘लम्पी स्कीन डिसीज’ हा विषाणू संसर्गाचे संकट ओढावल्याने आठही तालुक्यातील पशुपालकांच्या अडचणीत भर पडली. ही बाब पशुसंवर्धन विभागाच्या लक्षात येताच जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचे निश्चित केले. त्यानंतर तीन लाखांच्या निधीतून लम्पी स्कीन डिसीजला अटकाव घालण्यासाठी उपयुक्त ठरणारी गोट फॉक्स लसीची खरेदी करून लसीकरणास सुरूवात केली. शुक्रवार २५ सप्टेंबरपर्यंत ८८ हजार ६९९ गाय वर्गीय जनावरांपैकी ८४ हजार २५० गोवंशांना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. कुठल्याही पशुवैद्यकीय दवाखान्यात गाय वर्गीय जनावरांना प्रतिबंधात्मक लस देण्यास नकार दिल्या जात असल्यास त्याची थेट तक्रार जिल्हा पशुसंवर्धन विभागाला करावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
बजाज फाऊंडेशनची मदत ठरली उपयुक्त
बजाज फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी जोपासत पशुसंवर्धन विभागाला गोट फॉक्स या औषधाच्या ४० हजार लस उलब्ध करून दिल्यात. शिवाय काही औषधसाठाही उपलब्ध करून दिला. वेळीच औषध उपलब्ध झाल्याने ते जिल्ह्यातील गोपालकांना दिलासा देणारे ठरले.
९९ अॅक्टिव्ह जनावरांवर होतोय औषधोपचार
वेळीच औषधोपचार मिळाल्याने आतापर्यंत तब्बल १० हजार ८५३ गाय वर्गीय जनावरे बरी झाली असली तरी सध्या ९९ गाय वर्गीय जनावरांवर सध्या उपचार सुरू आहेत. लवकरच ही जनावरे बरी होतील असा विश्वास तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. तर लसीकरण मोहीम उपयुक्त ठरत आहे.